जितेंद्र कालेकर ठाणे : श्वास घेण्यास त्रास झालेल्या कल्याणच्या एका २६ वर्षीय विवाहितेवर ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवस प्रतीक्षा करुनही तिचा कोरोनाचा अहवाल आलाच नाही. उशिरा अहवाल मिळाल्यामुळे कोविड रुग्णालयात हलविण्यापूर्वीच तिचा सोमवारी मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.कल्याणच्या खडकपाडा येथे राहणाऱ्या या विवाहितेला श्वसनाबरोबरच किडनीचा त्रास होता. तसेच तिला तापही आला होता. त्यामुळे ती रुक्मिणीबाई रुग्णालयात पतीसह १७ जून रोजी गेली होती. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार तिला बुधवारी रात्री ८ वाजता ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. १८ जून रोजी तिला पहाटेच्या सुमारास अतिदक्षता विभागात दाखल केले. त्याचदिवशी सकाळी कोरोना तपासणीसाठी तिचा स्वॅब घेण्यात आला. मात्र, तीन दिवस उलटूनही केवळ पत्ता वेगळा असल्याचे कारण दाखवत तिचा अहवालच देण्यात आला नाही. अखेर २० जून रोजी कुटुंबीयांच्या आग्रहानंतर तिचा पुन्हा स्वॅब घेण्यात आला. याच काळात तिला डायलेसिसचीही गरज असताना केवळ रिपोर्टअभावी डायलेसिसही करण्यात येत नव्हते. मात्र, प्रकृती गंभीर होत चालल्याने, शिवाय हिमोग्लोबिन कमी असल्याने तिचे डायलेसिस करण्यात आले. दरम्यान, दुसऱ्यांदा घेतलेल्या स्वॅबचा अहवाल २२ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पॉझिटिव्ह आला. तिला अन्यत्र कोविड रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही या रुग्णालयातून देण्यात आला. मात्र ११.४० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
अहवाल वेळेत, किमान दुसऱ्या दिवशी मिळाला असता, तरी तिला तातडीने ठाण्यातील अन्य कोविड रुग्णालयात दाखल करता आले असते. वेळेत अहवाल न मिळाल्याने आधीच गंभीर आजारी असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला आहे. यासदंर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. प्रतिभा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.