CoronaVirus News : शिवसेना-भाजपच्या अपयशाची शिक्षा लोकांना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:14 AM2020-06-22T00:14:49+5:302020-06-22T00:15:10+5:30

या शहरातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आले असते तर लॉकडाऊनच्या आड लपण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही शहरांतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

CoronaVirus News : People are punished for the failure of Shiv Sena-BJP | CoronaVirus News : शिवसेना-भाजपच्या अपयशाची शिक्षा लोकांना

CoronaVirus News : शिवसेना-भाजपच्या अपयशाची शिक्षा लोकांना

googlenewsNext

प्रशांत माने 
कल्याण : कल्याण-डोंबिवली या शहरांतील १७ लाखांच्या लोकसंख्येकरिता गेल्या २० वर्षांत पाच ते दहा हजार बेडचे सुसज्ज इस्पितळ उभारण्यात अपयशी ठरलेले सर्वपक्षीय नेते कोरोना वाढत असल्याचे निमित्त करुन लॉकडाऊनची भाषा करीत असून आयुक्तांच्या गळ््यात निर्णयाचे घोंगडे अडकवत आहेत. या शहरातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आले असते तर लॉकडाऊनच्या आड लपण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही शहरांतील नागरिक व्यक्त करीत आहेत.
कोरोनाच्या महामारीत परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत असताना केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रूग्णांना बेडही मिळू नये ही शरमेची बाब आहे. एकीकडे खाजगी रूग्णालयांकडून लूट सुरू असताना दुसरीकडे महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेणाऱ्या रूग्णांचे उपचाराअभावी बळी जात आहेत. महापालिकेत २० वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगणाºया शिवसेना आणि भाजप बरोबरच विरोधी पक्षांचेही हे अपयश आहे. गेल्या काही वर्षात कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील १७ लाख लोकसंख्येसाठी एखादे मोठे सरकारी रूग्णालय ते उभारु शकले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची भाषा करून आयुक्तांवर दबाव आणत आहेत. लॉकडाऊन हा पर्याय नाही. केवळ पुढील महापालिका निवडणुका डोळ््यासमोर ठेवून आपले अपयश झाकण्यासाठीच लॉकडाऊनची मागणी करून अपयशाचे खापर प्रशासनावर फोडण्याची खेळी लोकप्रतिनिधींनी खेळली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.
केडीएमसीची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर अशी दोन मोठी रूग्णालये तर १३ आरोग्य केंद्रासह चार छोटी रूग्णालये आहेत. सद्यस्थितीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीनगर रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून चालविले जात आहे. आरोग्य केंद्रांमध्ये तापाचे दवाखाने सुरु आहेत. आधीच आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असताना कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी बहुतांश कर्मचारी वर्ग दिला आहे. त्यामुळे रुक्मिणीबाई रूग्णालयावर ताण पडला आहे. आजच्याघडीला शास्त्रीनगर रूग्णालयात बेडची संख्या ६२ आहे तर रुक्मिणीबाई रुग्णालयात १२० बेड असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. व्हेंटिलेटर सुविधा असल्याचे सांगितले जात असले तरी शास्त्रीनगर रूग्णालयात अतिदक्षता विभागाची सुविधा नाही.
लॉकडाऊनचा निर्णय आयुक्तांच्या गळ््यात घालून लोकप्रतिनिधी मोकळे झाले आहेत. आयुक्तांना आपल्या सेवापुस्तिकेत लाल शेरा नको असल्याने ते लोकप्रतिनिधींची मागणी अमलात आणून मोकळे होतील. मात्र त्याची शिक्षा ही सर्वसामान्यांना मिळणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. खासदारांनी वेळोवेळी रूग्णालयांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ती सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या सूचना अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिल्या आहेत. परंतु या सर्व अपयशाची शिक्षा लॉकडाऊन करुन नागरिकांना का देणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
>आनंदीबाई जोशींचा
वारसा कसला सांगता?
कल्याणमधील आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. त्याचा सार्थ अभिमान असल्याचे आपण सांगतो. पण, त्यांच्याच शहरात महापालिकेचे एखादे मोठे सुसज्ज रूग्णालय नाही, ही सत्ताधाºयांबरोबरच विरोधी पक्षांसाठीही लाजिरवाणी बाब आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये तापाचे दवाखाने सुरु आहेत.

Web Title: CoronaVirus News : People are punished for the failure of Shiv Sena-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.