Coronavirus News: धक्कादायक: बाहेर फिरण्यास विरोध केल्याने क्वारंटाईन व्यक्तीने केली दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:17 PM2020-06-19T22:17:46+5:302020-06-19T22:21:30+5:30
ठाण्याच्या कळवा भागातील एका कोरोनाग्रस्ताच्या कुटूंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तरीही या कुटूंबियांपैकी एकजण घराबाहेर फिरत असतांना त्याला या सोसायटीतील रहिवाशाने हटकल्यानंतर त्याच्यावरच त्याने दगडफेक करीत शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आता याप्रकरणी सोयायटीने पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे दाद मागितली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील एका कोरोनाग्रस्ताच्या कुटूंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तरीही या कुटूंबियांपैकी एकजण घराबाहेर फिरत असतांना त्याला या सोसायटीतील सदस्याने हटकल्यानंतर त्यांच्यावरच त्याने दगडफेक करीत शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी या सोयायटीने पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे तक्रार केली आहे.
कळव्यातील राणा टॉवरजवळील या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील एका व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला सफायर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या कुटूबातील पाच जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तरीही त्याचा मुलगा गुरुवारी या सोसायटीच्या बाहेर बिनधास्तपणे फिरत होता. त्याला सोसायटीतील रहिवाशांनी तसेच काही महिलांनी अटकाव केल्यानंतर त्यांनाच त्याने शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच पहिल्या मजल्यावर पेव्हर ब्लॉकची वीटही फेकून मारल्याने या भागात १८ जून रोजी दुपारी ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास तणावाचे वातावरण झाले होते. त्याची तक्रार सोसायटीतील महिलांनी कळवा पोलीस ठाण्यात केली. त्यावर पोलिसांनीही या कुटूंबाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांसमोरच या कुटूंबातील एकाने अश्लील शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप सोसायटीतील महिलांनी केला आहे. याप्रकरणी सोसायटीतील कदम, पगारे, देवेंद्रम आणि काटे आदी कुटूंबीयांनी पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे शुक्रवारी मेलद्वारे तक्रार केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात याच कुटूंबातील कोरोनाग्रस्ताला येथील परिचारिकेने जुगार खेळण्याला अटकाव केला होता. त्यावेळी तिला आणि तिच्या पतीलाही त्याने मारहाण करीत धमकी दिली होती. आता पुन्हा हा दगडफेकीचा प्रकार घडल्याने या भागात तणावाचे वातावरण आहे.