Coronavirus News: धक्कादायक! ठाणे आयुक्तालयात एकाच दिवसात ३० पोलिसांना कोरोनाची लागण
By जितेंद्र कालेकर | Published: June 26, 2020 11:58 PM2020-06-26T23:58:09+5:302020-06-27T00:03:26+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात बुधवारी एकाच दिवसात तब्बल ३० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठया प्रमाणात पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने एकच खळबळ उडाली. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एका निरीक्षकासह तब्बल ३० पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवारी एकाच दिवसात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पोलिसांना लागण झाल्याचे हे सर्वाधिक प्रमाण असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकासह एका पोलीस नाईकालाही २५ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले. त्यापाठोपाठ राज्य राखीव पोलीस दलातील ११, बदलापूर पोलीस ठाण्यातील चार, मुख्यालयातील चार, भिवंडी नियंत्रण कक्षातील दोन, वागळे इस्टेटचे एक जमादार तसेच कोळसेवाडी, मोटर परिवहन, चितळसर आणि खडकपाडा या पोलीस ठाण्यातीलही प्रत्येकी एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. यातील राज्य राखीव दलाच्या जवानांना मरोळ येथील पीटीएस, कोरोना केंद्रात तर मुख्यालयातील दोघांना अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतरांवर ठाणे, बदलापूर आणि पुणे अशा वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आतापर्यंत ४२ अधिकारी आणि ३८७ कर्मचारी अशा ४२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ३१३ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून तिघांचा मृत्यु झाला आहे. तर १२ अधिकारी आणि १०१ कर्मचारी अशा ११३ जणांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
* यापूर्वी चार दिवसांपूर्वी सर्वाधिक म्हणजे १७ पोलिसांना कोरोनाची एकाच दिवसात बाधा झाली होती. त्यानंतर आता थेट एकाच दिवसात ३० पोलीस बाधित झाल्याने पोलिसांची चिंता अधिक वाढली आहे.