CoronaVirus News: कोरोनाचा संसर्ग नसतानाही करावी लागतेय चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 01:45 AM2020-06-20T01:45:43+5:302020-06-20T01:45:51+5:30
ठाण्यात आजच्या घडीला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यापैकी २,८३५ रुग्ण बरे झाले असून, २,७५२ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.
ठाणे : कोरोनासारखी केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांचे ठाण्यात हाल सुरु आहेत. शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांतील ओपीडीमध्ये त्यांना प्रथम कोरोनाची चाचणी करा मगच उपचारासाठी आमच्याकडे या, असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कोरोना नसतानाही नागरीकांना भूर्दंड सोसावा लागत आहे. याशिवाय अहवाल येईपर्यंत त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड होण्याचे प्रकारही घडत आहेत.
ठाण्यात आजच्या घडीला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यापैकी २,८३५ रुग्ण बरे झाले असून, २,७५२ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. आतापर्यंत १८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनासमोरील डोकेदुखी वाढत आहे. रोज १00 हून अधिक कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यातील प्रत्येकाला कोरोनाचा संसर्ग झालाच आहे, असे नाही. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनेक जण खाजगी लॅब, तसेच महापालिका, वाडीया दवाखाना येथे गर्दी करीत आहेत. एखाद्या रुग्णाला साधा सर्दी, ताप किंवा खोकला झाला असेल तरी खाजगी रुग्णालये त्याला आधी कोरोनाची चाचणी करा मगच आमच्याकडे उपचारासाठी या, असा सल्ला देत आहेत.
ठाण्यात लहानमोठी ३४४ खाजगी रुग्णालये आहेत. यातील १७ रुग्णालये ही कोविड सेंटर आहेत. उर्वरित रुग्णालये ही इतर आजारांच्या रुग्णांसाठी ठेवण्यात आली आहेत. परंतु अशा रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी गेलेल्या रुग्णांना कोरोना नसतानाही चाचणी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडू लागली आहे. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ही चाचणी करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
खबरदारीसाठी चाचणी
एखाद्या रुग्णाला कोरोनासारखी लक्षणे असतील, तर खबरदारी म्हणून त्यांना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. इतरांना त्याची बाधा होऊ नये म्हणूनच हा सल्ला दिला जात असल्याची माहिती महापालिकेचे कोविड प्रमुख डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली.