लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी देखिल कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली. गेल्या २४ तासांमध्ये जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात रविवारी देखिल सर्वाधिक ६६१ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. तर आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची १२ हजार ८१३ तर मृतांची संख्या १८९ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या परिसरात बाधितांची ४१७ तर नऊ जणांच्या मृत्यूमुळे याठिकाणी बाधितांची १३ हजार ३४२ तर, मृतांची संख्या ५०८ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नविन ३१३ रुग्ण दाखल झाले. तर ११ जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या नऊ हजार ४४५ तर मृतांची संख्या ३०३ इतकी झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ११९ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची पाच हजार ५६८ तर मृतांची संख्या १९१ झाली. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ७९ बाधितांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ७८२ च्या घरात गेली असून मृतांची संख्याही १४६ च्या घरात पोहचली आहे. उल्हासनगरमध्ये रविवारी २८६ नविन रुग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची चार हजार २०० तर मृतांची संख्या ६७ झाली आहे. अंबरनाथमध्ये तब्बल १०० नविन रुग्ण दाखल झाले असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी आता बाधितांची संख्या दोन हजार ६७४ तर मृतांची संख्या १०५ इतकी झाली. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये ४१ रु ग्ण नव्याने नोंदविले गेले. याठिकाणी एकूण बाधितांची संख्या आता एक हजार ३९३ झाली असून सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ही २० आहे. तर ठाणे ग्रामीण भागात शनिवारप्रमाणेच रविवारी देखिल १३४ नवे रुग्ण दाखल झाले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार २७ इतकी झाली असून मृतांची संख्या आता ८७ च्या घरात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली.