Coronavirus News: लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:33 PM2020-07-02T20:33:56+5:302020-07-02T20:46:00+5:30
विनाकारण घराबाहेर पडणा-या तसेच लॉकडाऊनचे नियम धुडकावणा-या तब्बल दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ युनिटच्या माध्यमातून गुरुवारी एकाच दिवसात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लॉकडाऊनचे नियम सर्रास तोडणा-या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील तब्बल दोन हजार ७४४ वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून १३ लाख नऊ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ३१६ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दोन दिवसांपूर्वी आवाहन केले होते की, २ ते १२ जुलै दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या क्षेत्रात कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. या काळात अत्यावश्यक तसेच वैद्यकीय कामाव्यतिरिक्त कोणीही आपली वाहने रस्त्यावर आणू नयेत. तरीही २ जुलै रोजी सकाळपासून वाहने रस्त्यावर आणणाºया दोन हजार ७४४ चालकांवर वाहतूक शाखेच्या विविध पथकांनी कारवाई केली. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रात ११८१ वाहन चालकांकडून पाच लाख ९३ हजारांचा दंड ई चलनाद्वारे वसूल करण्यात आला. तर भिवंडीमध्ये ७३३ वाहने तीन लाख २१ हजार ४०० रुपयांचा दंड, कल्याण डोंबिवलीमध्ये २८४ वाहने- एक लाख २८ हजार ८०० रुपयांचा दंड, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या क्षेत्रात २३७ वाहने- एका लाख १७ हजार २०० रुपयांचा दंड तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील ३०९ चालकांकडून एक लाख ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* दरम्यान, २ जुलै रोजी सपूर्ण दिवसभरात वाहतूकीचे तसेच सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळणा-या ३१६ चालकांची वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये २४९ मोटारसायकली, ४५ रिक्षा आणि ११ मोटारकारचा समावेश आहे. नारपोलीमध्ये सर्वाधिक ४८, उल्हासनगरमध्ये ३१ तर वागळे इस्टेटमध्ये २७ दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.