ठाणे : ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रभाग समित्यांमधूनही आता रुग्णांची आकडेवारी घसरत आहे. एवढेच काय, जवळजवळ सहा महिन्यांपासून रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतही रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, मागील सात दिवसांत या प्रभाग समितीमध्ये ३५४ रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत सर्वात कमी १९ रुग्ण मुंब्रा प्रभाग समितीत आढळले आहेत.शहरात कोरोनाची सुरुवात मार्चपासून झाली. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३०८ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९४.९५ टक्के झाले असून, मृत्युदरही कमी झाला आहे. शहरात आजच्या घडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १,४४९ एवढी असून, आतापर्यंत ४६ हजार २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १,१९६ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाने झोपडपट्टी भागात शिरकाव केल्याने त्याला रोखायचे कसे, असा पेच निर्माण झाला होता, परंतु मुंब्य्राने यात प्रथम बाजी मारली. या भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या विविध उपाययोजनांमुळे कमी झाली. त्यामुळे संपूर्ण ठाण्यात मुंब्रा पॅर्टनची चर्चा होऊ लागली. त्याच वेळी लोकमान्यनगर आणि वागळे येथील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला. सोबतच माजिवडा मानपाडा, वर्तकनगर, कळवा, नौपाडा कोपरी, दिवा आदी भागांतील झोपडपट्ट्यांतही कोरोनाने शिरकाव केला. पालिकेच्या उपाययाेजनांमुळे झोपडपट्ट्यांतूनही कोरोना हळूहळू हद्दपार होत आहे. घरोघरी जाऊन तपासणी केल्याने फायदाठाणे : ठाण्यातील झोपडपट्टी भागांमध्ये सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची वाढती संख्या महापालिकेसाठी तापदायक ठरत होती. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेने एका रुग्णामागे ४५ जणांना क्वारंटाइन करण्यास सुरुवात केली, तसेच या भागातील घराघरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी ताप क्लिनिक सुरू करण्यात आले. त्यामुळे हळूहळू का होईना, झोपडपट्टी भागांतून कोरोना हद्दपार होताना दिसत आहे. पूर्वी कळवा, लोकमान्यनगर आणि वागळे इस्टेटमध्ये ७० ते १०० रुग्ण दिवसाला आढळून येत होते. जवळपास असेच प्रमाण माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतही होते, परंतु आता या भागांमध्ये नव्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. पूर्वी येथे ८० ते १०० रुग्ण रोज आढळत होते. आता हे प्रमाण दिवसाकाठी केवळ १५ ते २० रूग्णांवर आले आहे. त्यामुळे पालिकेनेही काहीसा सुस्कारा सोडला आहे. मुंब्य्रात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. माजिवडा मानपाडा भागातही नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून, कळव्यालाही काहीसा दिलासा मिळाला आहे.
coronavirus: प्रभाग समित्यांमधूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 3:19 AM