मीरा रोड : महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय व एका इमारतीत सुरु केलेल्या कोविड केअर केंद्रात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असले तरी कोरोना संशयित रुग्ण व अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांची परवड सुरु आहे. खाजगी रुग्णालयांमधील राखीव खाटा व त्यासाठी रुग्णांना आकारले जाणारे दर आदींचा तपशील देण्यास महापालिका प्रशासन कमालीची टाळाटाळ करीत आहे.मीरा भार्इंदर महापालिकेने जोशी रुग्णालयाबरोबर रामदेव पार्क भागात लक्षणे दिसत नसणाऱ्या कोरोना रुग्णांकरीत कोविड केअर केंद्र सुरु केले आहे. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहता पालिका रुग्णालये अपुरी पडत असून व्हेंटिलेटरची संख्या प्रचंड कमी आहे. जोशी रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत असल्याने कोरोनाची लक्षणे असणाºया परंतु अहवाल न आलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. परंतु अहवाल यायला होणाºया विलंबामुळे उपचार करणे टाळले जाते, अशा तक्रारी आहेत. काही रुग्ण दाखल न केल्याने मरण पावले व नंतर त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाºया भरमसाठ बिलांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. पालिकेचे जनसंपर्क अधिकारी राज घरत, उपायुक्त संभाजी वाघमारे तसेच प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रमोद पडवळ यांच्याकडून याबाबत एकतर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत किंवा त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
CoronaVirus News: तोकड्या यंत्रणेमुळे खासगी इस्पितळांचे उखळ पांढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 1:52 AM