ठाणे : कोरोनाच्या या संकटकाळी रुग्णांच्या सेवेत असलेल्या परिचारिका, वार्डबाँय जीव मुठीत घेऊन सेवा देत आहे. तर काही कोरोनाची लागण होऊन उपचार घेत आहे. पण आता यावर मात करण्यासाठी डोंबिवली येथील सुनील नगर तेथील रहिवासी असलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतीक तिरोडकर याने मोबाईल वर आँपरेट करता येईल असा कोरो रोबोट तयार केला आहे. तो सध्या कल्याण येथील होलीक्रॉस कोविड रुग्णालयात रुग्ण सेवा करीत आहे, असे प्रतीकने लोकमतला सांगितले.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या रुग्णांच्या सेवेसाठी वार्डमध्ये राहणाऱ्या परिचारिका, वार्डबाँय आदींना अधीक धोका असल्याचे लक्षात घेऊन भीतीचे वातावरण आहे. त्यांचा हा धोका कमी करण्यासाठी प्रतीकने या रोबोची निर्मिती केल्याचे सांगितले. या आधी तो ठाण्यात राहायला होता आता डोंबिवलीत (पू. ) सुनील नगरमध्ये वास्तव्याला आहे. वॉर्ड बॉईज, परिचारिका हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आघाडीवर असणारे कोरोना योद्धे आहेत. रुग्णांसोबत त्यांना सर्वात जास्त काळ व्यतीत करावा लागतो, त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंगमध्ये पदवी घेतलेल्या प्रतीकने कोरो रोबोटची निर्मिती केली.
साधा मोबाईल आँपरेट करणार्यांना हा रोबोट आँपरेट करता येतो. कोरो- रोबोटमुळे आता नर्सेस, बोर्डबॉईज यांच्या संपर्काची गरज नाहीशी करतो. तो रुग्णांना अन्नपाणी आणि औषधे पुरवण्याचे काम करतो. कॅमेर्याच्या मदतीने तो रुग्णांशी संवादही साधू शकत आहे. यात एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील आहे. तसेच त्यात सॅनिटायझर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार तासांच्या चार्जिंगनंतर सहा ते आठ तास तो कार्यरत राहतो. इंटरनेटच्या माध्यमातून या रोबोटला कार्यान्वित केले जात असल्याने त्याला अंतराचे बंधन नाही. प्रतिकने तयार केलेला आणि प्रत्यक्षात वापरात आलेला हा पहिलाच रोबोट आहे. अन्नपदार्थ, औषधे, फळे ठेवण्यासाठी ट्रेची रचना यामध्ये करण्यात आली आहे. या पदार्थांच्या साठवणुकीची व्यवस्थाही आहे.
पाणी, औषधे, अन्न देणाऱ्या ट्रेमध्ये सेन्सर्स लावण्यात आले आहेत. ते स्वयंचलितपणे हाताच्या हालचालीवर काम करतात. यातून सुलभतेबरोबरच वस्तूंचा अपव्यय टळतो. या रोबोटमध्ये एलईडी लाईटच्या मदतीने प्रकाशाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्याचे रात्री संचालन करणेदेखील शक्य होत आहे. यावर एक छोटेसे संगणकवजा लावण्यात आलेले असल्यामुळे त्यातून छोटीमोठी कामे, मनोरंजनाची सोय होत आहे. लॉकडाउनच्या काळात रोबो बनवण्याची उपकरणे मिळणे अवघड झाले होते. तरी देखील रोबोटच्या आकारास आणला. त्यासाठी तीन ते चार सहकाऱ्यांची त्याने मदत घेतली. रोबोटचे पार्ट बनवणारी दुकाने बंद असल्याने त्यांनी स्वतः ते पार्ट तयार केले. पंधरा ते वीस दिवसात बनलेला हा प्रायोगिक रोबो सध्या कल्याण येथील होली क्रॉस रुग्णालयात सेवा देतो आहे. प्रतीकला विश्वास आहे की तो दर आठवड्याला दोन ते तीन रोबोट बनवू शकतो.