Coronavirus : ठाण्यातील दुकाने आजपासून बंद, गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस करणार अंशत: लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:54 AM2020-03-20T02:54:30+5:302020-03-20T02:54:58+5:30

स्टेशन परिसरासह गोखले रोड आणि राममारुती रोडवरील दुकाने शुक्रवारपासून तीन दिवस बंद राहणार

Coronavirus : Thane shops closed from today, partial lockdown for three days to prevent rush | Coronavirus : ठाण्यातील दुकाने आजपासून बंद, गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस करणार अंशत: लॉकडाउन

Coronavirus : ठाण्यातील दुकाने आजपासून बंद, गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस करणार अंशत: लॉकडाउन

Next

ठाणे  -  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध भागांत अंशत: लॉकडाउन सुरू झाले आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना यापूर्वीच करण्यात आले होते. आता यावर ठोस उपाय म्हणून शहरातील सर्वच दुकाने पुढील तीन दिवस बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार स्टेशन परिसरासह गोखले रोड आणि राममारुती रोडवरील दुकाने शुक्रवारपासून तीन दिवस बंद राहणार आहेत.

नौपाडा पोलीस ठाण्यात गोखले रोड आणि राममारुती रोडवरील व्यापाऱ्यांच्या, तर ठाणेनगर पोलीस ठाण्यात स्टेशन परिसरातील व्यापा-यांच्या बैठका गुरुवारी घेण्यात आल्या. या बैठकीअंती शुक्रवार, शनिवार आणि रविवारी संपूर्ण स्टेशन परिसर, गोखले रोड आणि राममारुती रोडवरील २५०० हून अधिक दुकाने बंद ठेवण्याचे ठरवण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी मांडलेल्या भूमिकेला व्यापाºयांनी होकार दिला आहे.

स्टेशन परिसरात जांभळीनाका ते स्टेशन हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, अशा दरात वस्तू उपलब्ध असतात. त्यामुळे या भागात इतर दिवशीपेक्षा शनिवारी आणि रविवारी अधिक गर्दी असते. गोखले रोड आणि राममारुती रोडवरदेखील अशीच परिस्थिती असते. राज्य शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केल्याने, या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापाºयांनी पुढील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी केलेल्या आवाहनाला आम्ही होकार दिला आहे. त्यानुसार, गोखले रोड आणि राममारुती रोड भागातील दुकाने तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. - मितेश शहा, अध्यक्ष, गोखले रोड व्यापारी एकता

स्टेशन परिसरात आठवडाअखेरीस नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी आम्ही तीन दिवस दुकाने बंद ठेवणार आहोत. - विनय शहा, ठाणे स्टेशन व्यापारी

कल्याण-डोंबिवलीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार
कल्याण : नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शुक्रवार, सकाळी ११ वाजल्यापासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रु ग्णालय, क्लिनिक, भाजीपाला विक्रेते आदी वगळता अन्य दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिले. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यावसायिक आस्थापना आणि दुकानमालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
कल्याणमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असले, तरी केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून खबरदारी म्हणून महापालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी महापालिका क्षेत्रातील उद्याने आणि मैदानांना कुलूपे ठोकण्यात आली आहेत.

केडीएमसीने तक्रारी, समस्या आणि अन्य कामांसाठी येणाºया नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयांमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. गुरुवारी आयुक्तांनी कार्यालयात रोटेशननुसार
50% कर्मचाºयांची उपस्थिती ठेवण्याच्या सूचना केल्या. महापालिका क्षेत्रातील रिक्षाचालकांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून रुमालाचा किंवा मास्कचा वापर करावा, शक्यतोवर सॅनिटायझर जवळ बाळगावेत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व आठवडाबाजार बंद
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व आठवडाबाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी दुपारी जारी केले. या आदेशांमुळे कल्याणच्या पिंपरी, गोवेली, म्हारळ, बेहेरे, राया-ओझर्ली येथील आठवडाबाजार बंद करावे लागणार आहेत.
याशिवाय, भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा, कोन, खारबाव, पडघा, पाच्छापूर, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, अंबाडी, अस्नोली येथील बाजारांचा समावेश आहे. तर, मुरबाडमधील सरळगाव, धसई, टोकावडे, म्हसा आणि शहापूरच्या आटगाव, किन्हवली, सापगाव, गोठेघर, पिवळी, मोखावणे-कसारा, शेणवे, अघई, डोळखांब या ठिकाणांवरील आठवडाबाजार बंद राहणार आहेत.
या आठवडाबाजारांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी अनौपचारिक स्वरूपात भरणारे छोटे बाजार व त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेशदेखील संबंधित प्रशासनाला दिल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंडसंहिता १८६० (४५) याच्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

साफसफाईसाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती रविवारी बंद
डोंबिवली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २२ मार्च रोजी २४ तासांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण बंद ठेवण्यात येणार असल्याचे समितीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे बुधवारी जाहीर केले. बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला बाजार, फु लबाजार, कांदाबटाटा, फळबाजार, अन्नधान्यबाजार, जनावरेबाजार इत्यादी सर्व बाजारांत साफसफाई व औषधफवारणी केली जाणार आहे. त्यामुळे रविवारी समितीच्या आवारात शेतमालाचे खरेदीविक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. अडते, व्यापारी, खरेदीकार, शेतकरी, माथाडी कामगार, मापाडी व अन्य घटकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन सभापती कपिल थळे यांनी केले आहे.

गर्दीची सर्वच ठिकाणे बंद करण्याचे आदेश
ठाणे : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार ठाणे शहरातील सर्व जलतरणतलाव, मॉल्स, सिनेमागृहे आधीच बंद करण्यात आली आहेत. याच धर्तीवर शहरातील सर्व प्रभागांमधील आठवडाबाजार, गर्दीची ठिकाणे, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या तत्काळ बंद करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला दिले.

त्यानुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत यासंदर्भात तत्काळ पावले उचलली असून, कारवाईला लगेचच सुरुवातही केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील गर्दी नागरिकांनी स्वत:हून कमी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. ठाण्याच्या पालकमंत्र्यांनीदेखील ठाणे शहर व परिसरामध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टिकोनातून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर खाऊगल्ली, चायनीज आणि इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर होणारी खवय्यांची गर्दी लक्षात घेता, या सर्व हातगाड्या तसेच आठवडाबाजार तत्काळ बंद करण्याच्या सूचना महापौरांनी अतिक्र मण हटाव विभागाला देत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेत असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Coronavirus : Thane shops closed from today, partial lockdown for three days to prevent rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.