Coronavirus vaccine updates: झटपट लसीकरणामुळे झाली ठाण्यात लसीची टंचाई; ५१ लसीकरण केंद्रामुळे आता झाली पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:21 AM2021-03-25T00:21:25+5:302021-03-25T00:22:07+5:30
जिल्ह्याला मिळाल्या पाच लाख ४८ हजार लसी
ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल पाच लाख ४८ हजार लसींच्या कुपी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात मागणीनुसार टप्प्याटप्प्याने लसींचे वाटप केले जात असताना, ठाण्यात झटपट लसीकरण करण्याकरिता अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण केंद्रे सुरू केल्याने आता लसींचा तुटवडा भासू लागला असल्याचे उघड झाले आहे.
जानेवारीमध्ये लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात डॉक्टर्स, कर्मचारी यांना लस दिली. विविध संस्थांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्याला ७४ हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ६४ हजार ५०० लसींचे डोस प्राप्त झाले. आतापर्यंत तब्बल पाच लाख ४८ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. जिल्ह्याला लसींचा अपुरा साठा मिळाला नाही. परंतु ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी, पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ठाण्यात १०० जणांचे लसीकरण होत होते. ती संख्या ३०० पर्यंत वाढवण्यात आली. लसीकरण केंद्रांची प्रारंभी असलेली संख्या नऊ होती. अल्पावधीत ती संख्या ५१ करण्यात आली.
या केंद्रांच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे १० हजार जणांचे लसीकरण करण्यात येत होते. लसीकरणाची संख्या ठाण्यात भरमसाठ वाढल्याने आता लसींचा नवा साठा लागलीच उपलब्ध होत नाही आणि मागे प्राप्त लस उपलब्ध नाही, अशा कात्रीत ठाणे शहर सापडले आहे. सध्या ११ खासगी आणि २६ सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरु असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. महानगरपालिकेला आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५०० कोव्हीशिल्डचा साठा प्राप्त झाला होता. त्यापैकी ९४ हजार ४२ लसींचा वापर झाला असून ६३ हजार ६७० शिल्लक आहेत. ज्यांना कोव्हीशिल्डची लस अगोदर दिलेली आहे, त्यांना तीच दिली जाणार असल्याची माहिती डॉ. राजू मुरुडकर यांनी दिली. सध्या कोव्हक्सिन लसीचा तुटवडा झाल्याने कोव्हीशिल्ड घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी राखून ठेवलेली लस पहिला डोस घेण्यास येणाऱ्यांना दिली जात आहे. कोव्हॅक्सिनचे ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले होते. त्यातील १८ हजार ३९५ डोस देण्यात आले असून आतापर्यंत १ लाख १२ हजार ४३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.