Coronavirus : आठवडी बाजार तात्काळ बंद करावेत, महापौरांचा प्रशासनाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 04:40 PM2020-03-19T16:40:11+5:302020-03-19T16:41:25+5:30
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेवून शहरातील गर्दी नागरिकांनी स्वत:हून कमी करावी असे
ठाणे : कोरोना या व्हायरसचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील सर्व जलतरण तलाव, मॉल्स, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. याच धर्तीवर ठाणे शहरातील सर्व प्रभागातील आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणे, चायनीजगाड्या, हातगाड्या तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेवून शहरातील गर्दी नागरिकांनी स्वत:हून कमी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री यांनी देखील ठाणे शहर व परिसरामध्ये गर्दी होणार नाही या दृष्टीकोनातून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळच्या वेळेस खाऊगल्ली, चायनीज तसेच हातगाड्यांवर होणारी खवय्येंची गर्दी लक्षात घेता आजपासून या सर्व हातगाड्या तसेच आठवडी बाजार देखील तात्काळ बंद करावेत अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला देत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हा निर्णय घेत असल्याचे नमूद केले आहे.
या सर्व आठवडाबाजार, तसेच हातगाड्यांवर कारवाई करणेसाठी प्रत्येक प्रभागसमिती कार्यालयात पथक तयार करण्यात यावे व या पथकाच्या माध्यमातून शहरात कुठेही आठवडी बाजार भरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच हातगाड्या व चायनीज यांनाही बंदी करण्यात यावी अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीदेखील आपली स्वत:ची जबाबदारी समजून आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे व महापालिका करीत असलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनदेखील महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.