अंबरनाथच्या डम्पिंगवर पडला चॉकलेट लॉलीपॉपचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:33+5:302021-09-26T04:43:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील मोरीवली डम्पिंग ग्राउंडवर अज्ञातांनी चॉकलेट लॉलीपॉप टाकले असून हे लॉलीपॉप उचलण्यासाठी कचरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील मोरीवली डम्पिंग ग्राउंडवर अज्ञातांनी चॉकलेट लॉलीपॉप टाकले असून हे लॉलीपॉप उचलण्यासाठी कचरा वेचक मुलांनी गर्दी केली आहे. एवढेच नव्हे तर काही तरुणांनी हे लॉलीपॉप मोठ्या गोणीमध्ये भरून त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे. त्यामुळे एकूणच शहरातील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अंबरनाथ शहराला लागूनच मोरीवली पाड्याजवळ डम्पिंग ग्राउंड आहे. हे डम्पिंग ग्राउंड काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले आहे. मात्र तरीही एमआयडीसी भागातील काही कंपन्या, तसेच काही हॉटेलचालक आपला कचरा अजूनही याच बंद डम्पिंगवर आणून टाकतात. त्यामुळे कंपनीच्या बाहेरच्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण पडलेली दिसते. याच डम्पिंगवर दोन दिवसांपासून लॉलीपॉपच्या गोण्या आणून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडवर लॉलीपॉपचा अक्षरशः खच पडल्याचे पाहायला मिळाले. हे लॉलीपॉप उचलून नेण्यासाठी कचरावेचक मुलांनी तसेच परिसरातील इतर काही मुलांनी प्रचंड गर्दी केली होती.
अंबरनाथ एमआयडीसीत चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं यांच्या अनेक कंपन्या आहेत. त्यांच्यातील एखाद्या कंपनीने हे चॉकलेट लॉलीपॉप या ठिकाणी आणून टाकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हे लॉलीपॉप ज्याअर्थी कचऱ्यात आणून टाकण्यात आले आहेत. त्याअर्थी ते खराब असावेत, किंवा एक्सपायरी डेट झालेले असावेत, अशी शक्यता आहे. त्यामुळे लॉलीपॉप उचलून खाणाऱ्या कचरावेचक मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. एवढेच नव्हे तर डम्पिंग ग्राउंडवर लॉलिपॉपचा खच पडल्याची माहिती काही तरुणांना मिळताच त्यांनी गोण्या भरून या ठिकाणावरून लॉलीपॉप उचलून नेले आहेत. भरून नेलेल्या लॉलीपॉपचे नेमके करणार काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, या तरुणांनी उचलून नेलेले लॉलीपॉपची जर शहर आणि परिसरात विक्री झाल्यास त्याचा धोका शहरातील इतर लहान मुलांनादेखील होण्याची शक्यता आहे.
-----------------