ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता खुद्द आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुहास देसाई यांनी थेट पक्षाचाच राजीनामा देऊन आव्हाडांवर टीकास्त्र सोडले आहे.
शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडे त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला असला तरी आनंद परांजपे यांनी मात्र तो स्वीकारलेला नाही. पक्षाचा राजीनामा दिला असला तरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . राज्यात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने रिकामी केली असली तरी ठाण्यात मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यप्रणालीमुळे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवकच आता पक्षाशी फारकत घेऊ लागले आहेत. विश्वासात न घेता परस्पर विरोधी पक्षाकडून परस्पर निर्णय घेतले जातात तसेच बदललेही जातात असा मुद्दा उपस्थित करून जगदाळे यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देसाई यांनी तर थेट पक्षाचाच राजीनामा दिला आहे. आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगून महत्त्वाची पदे दिली जात नाही. प्रामाणकिपणे काम करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी थेट आव्हाडांवर टीका केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असून ते राबोडी येथील प्रभाग क्र मांक १० मधून नेतृत्व करतात.प्रत्येक गोष्टीत आम्हाला डावलले जाते. कोणत्याही प्रकारची महत्त्वाची जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे संतापून पक्षाचा राजीनामा दिला आहे . मात्र, कोणत्याही पक्षात जाणार नसून प्रामाणिकपणे काम करणार आहे.-सुहास देसाई, नगरसेवक राष्ट्रवादी काँगे्रस