भिवंडीत बनावट नोटा बनवणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:29+5:302021-09-25T04:44:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : बनावट नोटा बनवून चलनात आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी जेरबंद करण्यात भिवंडीतील शांतीनगर पोलिसांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : बनावट नोटा बनवून चलनात आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी जेरबंद करण्यात भिवंडीतील शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून, या टोळीकडून ५०० व १०० रुपयांच्या दोन लाख १९ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा व नोटा छपाईसाठी उपयोगात आणला जाणारा कागद, प्रिंटर आदी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. यातील एक आरोपी कॉम्प्युटर सायन्समधील पदवीधर आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक रवींद्र पाटील यांना साईबाबा मंदिर कल्याण रोड या परिसरात एक जण बनावट नोटा एका व्यक्तीस देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून अहमद नाजम नाशिककर (३२) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक लाखाच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे साथीदार मोहम्मद शफीक अश्फाक अहमद अन्सारी (३५) व चेतन एकनाथ मेस्त्री (४१) यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एक लाख १९ हजार ५०० किमतीच्या ५०० रुपयांच्या नोटांसह बनावट नोटा बनविण्यासाठी वापरले जाणारे लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेटर, सॉफ्टवेअर, प्रिंटिंगचे कागद, अर्धवट प्रिंट केलेल्या ५०० व १०० रुपयांच्या नोटा असा एकूण दोन लाख ७० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तिन्ही आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपी चेतन एकनाथ मेस्त्री हा कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवीधर असून, त्याने यूट्युबवरील बनावट नोटा बनविण्याचे व्हिडिओ बघून हा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोहिते करीत आहेत.
...........
वाचली.