नियोजनाअभावी लसीकरण केंद्रांवर गर्दी-गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:40 AM2021-03-03T00:40:00+5:302021-03-03T00:40:11+5:30
ज्येष्ठांचे झाले अतोनात हाल : महापौर नरेश म्हस्के यांना मागावी लागली नागरिकांची माफी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोमवारी पहिल्या दिवशी लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी ठाण्यात महापालिकेने सुरू केलेल्या अनेक केंद्रांवर गोंधळ, गर्दी आणि नियोजनाचा अभाव दिसला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक चांगलेच संतापले होते. एकीकडे उन्हाच्या झळा, त्यात बसण्यासाठी खुर्च्यांचा अभाव, पिण्यास पाणी नाही. अशातच सकाळी १० वाजल्यापासून बसूनही लसीकरणासाठी अनेकांना तीन तास ताटळकत थांबावे लागले. कोपरी लसीकरण केंद्रावर हा गोंधळ अधिक होता. त्याठिकाणी महापौर नरेश म्हस्के यांना ज्येष्ठ नागरिकांनी घेराव घातला. यामुळे महापौरांवर त्यांची माफी मागण्याची वेळ आली.
ठाणे महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या १५ केंद्रावर ती सुरू झाली आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून बहुसंख्य केंद्रावर ज्येष्ठांच्या रांगा होत्या. महापालिकेने १२ ते ५ ही वेळ निश्चित केली असली तरी आपला क्रमांक पहिला लागावा यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रत्येक केंद्रावर वेळेत हजर असल्याचे दिसले. परंतु, पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका त्यांना बसला. ज्येष्ठांबरोबर अनेक केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्सने देखील गर्दी केल्याने आधी येऊनही ज्येष्ठांना या वर्कर्सनंतर लसीकरण केले जात होते. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
कोपरीच्या केंद्रावरही उडाला मोठा गोंधळ
nकोपरी येथे आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून ज्येष्ठांनी रांगा लावल्या होत्या. परंतु लसीकरणाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. विशेष म्हणजे आधी लखीचंद फतीचंद येथे हे लसीकरण करण्यात येत होते.
nमंगळवारी ठिकाण बदलल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय महापौर येणार म्हणून ते आल्यानंतर लसीकरण सुरू केले. त्यामुळे ज्येष्ठांनी याचा राग थेट त्यांच्यावरच काढला.
nसकाळपासून रांगेत उभे असताना साधे पाणी नाही, बसण्यासाठी खुर्च्या नाहीत, उन्हातान्हात बाहेरच रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. महापौरांना त्यांची माफी मागावी लागली. बसण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगून खुर्च्या आणि पाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले.
आधी लखीचंद फतीचंद केंद्रावर लसीकरण सुरू होते. एका दिवसात केंद्र का बदलले? सकाळपासून येथे ज्येष्ठ नागरिक आले असून त्यांच्यासाठी पाण्याची, बसण्यासाठी व्यवस्था केली नाही. महापालिकेने किमान या गोष्टींकडे तरी गांभीर्याने पाहणे गरजेचे होते.
- भरत चव्हाण, स्थानिक नगरसेवक
केंद्रावर गोंधळ झाल्याचे, सुविधा मिळत नसल्याचे मी मान्य करतो. ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने अडचण झाली. दुसरा डोस घेण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्स आल्याने गोंधळ उडाला. यावर तोडगा काढला जाईल. ज्येष्ठांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो.
- नरेश म्हस्के, महापौर
ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन
लसीकरणासाठी ज्या ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे, त्या ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याचे चित्र मंगळवारी, सलग दुसऱ्या दिवशीही दिसले. त्यामुळे नोंदणी करण्यासही उशीर लागत होता. त्यामुळे खील अनेक ठिकाणी रांगा लागल्या.