कल्याण : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून १०० रुपये दंडाची पावती फाडण्याऐवजी जबरदस्तीने दोन हजारांची खंडणी उकळणाºया गणेश गोडसे (२२, रा. नवी मुंबई) आणि दीपक करांडे (२२, रा. मुंबई) यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
पहिले वर्षभर जनजागृती केल्यानंतर महिनाभरापूर्वी केडीएमसीने स्वच्छता अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मार्शल नियुक्त केले आहेत. यासाठी कंत्राट दिले असून, कल्याणमध्ये ६० आणि डोंबिवलीत ६० मार्शल नेमले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपये, कचरा टाकल्यास १५० रुपये, लघुशंका १०० रुपये, शौचास ५०० रुपये अशी दंडाची तरतूद आहे. मात्र, अनेक ठिकाणी मार्शल नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.
संतोष चव्हाण (३७, रा. उल्हासनगर) रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास कल्याणमध्ये खरेदीसाठी आले होते. ते एसटी आगार परिसरातून चालत जात असताना त्यांना गणेश व दीपक यांनी हटकले. तुम्ही रस्त्यावर थुंकला आहात, असे सांगत त्यांच्याकडे स्वच्छ भारत अभियानाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची मागणी केली. तसेच दंड न भरल्यास पोलीस कारवाई केली जाईल, अशी भीती घातली. कारवाई टाळायची असेल, तर दोन हजार रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार, चव्हाण यांनी दोन हजार रुपये दंड भरत पावतीची मागणी केली. एका पावतीच्या मागील बाजूस चव्हाण यांची सही घेतली. मात्र, त्यांना पावती दिली नाही.याप्रकरणी चव्हाण यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.