दाभाड गटात शिवसेना, भाजपात होणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:37 AM2017-12-09T01:37:50+5:302017-12-09T01:38:24+5:30
भिवंडी तालुक्यातील दाभाड चावे जिल्हा परिषद गटात शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (सेक्युलर) युतीचे शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणप्रमुख प्रकाश पाटील तर
अनगाव : भिवंडी तालुक्यातील दाभाड चावे जिल्हा परिषद गटात शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (सेक्युलर) युतीचे शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणप्रमुख प्रकाश पाटील तर भाजपा, श्रमजीवी संघटना आघाडीचे भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयानंद पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही पाटील रिंगणात असल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दाभाड चावे जि.प. गटात शिवसेनेची ताकद आहे. लाप, खांडपे, चिंचवली, दाभाड, खांबाला, पुडास, कोशिंबे, चावे, खालिंग या आठ ग्रामपंचायती व त्यामधील गावपाड्याचा समावेश आहे. दाभाड गटात भाजपाचे माजी उपसरपंच गुरूनाथ जाधव, चावे गणात साईनाथ पाटील, शिवसेनेचे चावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रविकांत पाटील, दाभाड गणातून अशोक शेलार हे निवडणूक रिंगणात आहेत. या गटात सेनेची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. त्यातच शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय (सेक्युलर) यांची युती असल्याने शिवसेनेचे लक्ष या गटाकडे लागले आहे.
पूर्वीचा लोनाड गट आता दाभाड झाला आहे. तेथे मागील निवडणुकीत सेनेचे कृष्णा वाकडे विजयी झाले होते. मागील निवडणुकीत सेनेसोबत श्रमजीवी संघटना होती. मात्र या निवडणुकीत ती भाजपासोबत असल्याने या गटातील श्रमजीवीची मते निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिलेला नसला तरी काँग्रेसचे तेजस पाटील निवडणूक लढवत आहेत.
दाभाड जि.प. गटात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व भाजपाचे चावे पंचायत समितीचे उमेदवार साईनाथ पाटील हे खाडपे गावाचे असल्याने येथील मतदार संभ्रमात आहेत. या गट, गणात सर्वच उमेदवारांचे नातेसंबंध असल्याने येथे युती आणि आघाडी दोघांची कसोटी लागणार आहे.
भाजपा व शिवसेनेचे उमेदवार कुठल्याच निवडणुकीत पराभूत झाले नसल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे.