डोंबिवलीत म्हात्रे नगरचा वीज पुरवठा आता खंडीत होणार नाही - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:59 PM2017-12-14T17:59:50+5:302017-12-14T18:02:59+5:30
डोंबिवली: येथिल राजाजीपथ लगतच्या म्हात्रे नगरमधील वीज पुरवठा सातत्याने विविध तांत्रिक कारणांमुळे खंडीत होत असतो. वर्षानूवर्षे ही समस्या तेथिल रहिवाश्यांना भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरात शून्य भारनियमन असतानाही या ठिकाणी महावितरणच्या तांत्रिक बाबींमुळे ही समस्या भेडसावते. पण आता ती समस्या त्या भागात भेडसावणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेचा शुभारंभ राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी केला.
त्यावेळी चव्हाण यांनी ती माहिती दिली. राज्य शासनाच्या या योजनेंतर्गत निधी, सुविधा मिळावी यासाठी स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानूसार म्हात्रेनगरमध्येही भूमीगत रिंगरूट पद्धतीने वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच उमिया सोसायटी ते आयोध्या सोसायटीच्या भागात भूमीगत गटार योजनेच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आल्याचे पेडणेकर म्हणाले. येथिल संकेत इमारतीनजीकच्या ज्येष्ठ नागरिक कट्याजवळ हा उपक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता, धर्मराज बिक्कड, कनिष्ठ अभियंता हर्षद म्हात्रे,पूर्वमंडलाचे अध्यक्ष संजीव बीडवाडकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिक्कड यांनीही एकात्म उर्जा योजनेसंदर्भात नागरिकांना माहिती सांगितली, म्हात्रे यांनी यासंदर्भात जनजागृती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आगामी तीन महिन्यात ही कामे होतील, त्यानंतर येथिल नागरिकांना सध्या भेडसावणारा त्रास कमी होइल असा विश्वास पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.