दादर ते टिटवाळा दोन, दादर ते डोंबिवली सहा, आणि कुर्ला ते कल्याण लोकल फे-या वाढूनही घुसमट कायम राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:42 AM2017-10-23T03:42:34+5:302017-10-23T03:42:37+5:30

मध्य रेल्वेच्या वाढीव फे-यांमध्ये दादर ते बदलापूर लोकलच्या दोन, दादर ते टिटवाळा दोन, दादर ते डोंबिवली सहा, आणि कुर्ला ते कल्याण लोकलच्या सहा फे-या आहेत.

From Dadar to Titwala, Dadar to Dombivali, six and Kurla to Kalyan local trains will remain intact. | दादर ते टिटवाळा दोन, दादर ते डोंबिवली सहा, आणि कुर्ला ते कल्याण लोकल फे-या वाढूनही घुसमट कायम राहणार

दादर ते टिटवाळा दोन, दादर ते डोंबिवली सहा, आणि कुर्ला ते कल्याण लोकल फे-या वाढूनही घुसमट कायम राहणार

Next

- अनिकेत घमंडी,
डोंबिवली- मध्य रेल्वेच्या वाढीव फे-यांमध्ये दादर ते बदलापूर लोकलच्या दोन, दादर ते टिटवाळा दोन, दादर ते डोंबिवली सहा, आणि कुर्ला ते कल्याण लोकलच्या सहा फे-या आहेत. त्यात कुठेही ठाणे-कर्जत-कसारा या मार्गावरील फे-या नाहीत. त्यामुळे ठाणे स्थानकात येताना या गाड्या गर्दीने खच्चून भरून येतील. परिणामी ठाणे स्थानकातील परतीच्या सहा लाख प्रवाशांपैकी किमान तीन लाख प्रवाशांची गैरसोय कायम असेल, असे रेल्वेचे अधिकारी सांगतात. या वाढीव गाड्यांमध्ये महिला प्रवाशांसाठी तीन ज्यादा डबे राखीव आहेत. यावरून महिलांची संख्या वाढली हे रेल्वेही अप्रत्यक्षरित्य मान्य करत आहे. पण तरीही गर्दीच्या वेळेत आणखी लेडिज स्पेशलची १० वर्षांपासूनची मागणी का पूर्ण केली जात नाही?, हा सवाल अनुत्तरीतच आहे.
लोकलच्या फेºया वाढवण्याची घोषणा तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०१० च्या अर्थसंकल्पात केली होती. माजी खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक, सुरेश टावरे आदींनी तेव्हा ही मागणी लावून धरली होती. या मागणीसाठीच २०१२ मध्ये प्रवासी संघटनांच्या पदाधिकाºयांनी परांजपे यांच्या समवेत तत्कालीन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विवेक सहाय यांची भेट घेतली होती. मात्र, आता पाच वर्षांनी अवघ्या १६ लोकल फेºया वाढवण्यात आल्या आहेत. कसारापर्यंत एकही फेरी वाढवल्याने रेल्वेने सापत्न वाढणूक दिल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. सहाय यांच्या भेटीनंतर आमदार संजय केळकर यांनीही माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत रेल्वे गर्दीची समस्या-उपाययोजना, यावर चर्चा करण्यासाठी ठाण्यात प्रवासी संघटनेची बैठक घेतली. या वेळी संघटनांनी सरकारी आणि खाजगी कार्यालयांच्या वेळा बदला, अशी सूचना केली होती. प्रभूंनी त्याची नोंद घेत या सूचनांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले आहे.
कसारा-कर्जत मार्गावरील प्रवासी हा नोकरी-व्यवसायानिमित्त सीएसएमटी, पनवेल तर चर्चगेट, विरार-वसईच्या दिशेपर्यंत प्रवास करतो. ठाणे जिल्ह्यात रेल्वेव्यतिरिक्त दुसरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच नाही. ठाण्यापर्यंत रेल्वेला समांतर रस्ता नाही. रेल्वे ठप्प झाल्यास दांडी मारण्याशिवाय पर्यायच नसतो. आता तर मुंबईतील अनेक खाजगी कंपन्यांची कार्यालये कल्याणपुढील युवकांना नोकºया नाकारतात. प्रवासातच दोन्ही वेळचे सहा तास गेल्यावर त्याचा परिणाम कामावर होण्याची भीती ते व्यक्त करतात. मुंबई, ठाण्याच्या नागरिकांना त्यातल्या त्यात परवडणाºया दरात घरे ही आसनगाव, बदलापूर-वांगणी पट्यातच असल्याने सर्वसामान्य माणसाने करायचे तरी काय? नोकरी मिळाली तर निवाºयाचा प्रश्न, तो सोडवायचा तर नोकरी नाही, अशा विचित्र कोंडीत युवावर्ग सापडला आहे. ही गंभीर समस्या निर्माण झाली असून जिल्ह्यातील बेरोजगारीत भर पडत आहे.
वाढती गर्दी नियंत्रणात आण्यासाठी मध्य रेल्वेने आता वाढीव फेºयांचा प्रयत्न केला असला तरी तो केविलवाणा आहे. गर्दीच्या वेळेत तीन मिनिटाला एक लोकल आहे, असे रेल्वेचे अभ्यासक सांगतात. तसे असले तरीही वाढत्या औद्योगिकरणाच्याच झपाट्याने रेल्वेचे जाळे विस्तारले का जात नाही. पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाचे काम २०१२ मध्ये व्हायला हवे होते. ते अद्यापही दिवा-ठाणे मार्गावर अडकलेले आहे. त्यात आधीच पाच वर्षे गेली असून आणखी किती काळ लागणार, याचे स्पष्टीकरण नाही. त्यामुळे कल्याण-दिवा आणि ठाणे-कुर्ला मार्गावरील पाचवी-सहावी मार्गिका तयार असून उपयोग नाही. या एका कारणामुळे दिवा-सीएसटी लोकल सोडणे, ठाणे-कसारा-कर्जत शटल सेवा देणे, डोंबिवलीतून जादा, तसेच जलदच्या लोकल सोडणे, या सर्व बाबींचा गुंता सोडवताना रेल्वे प्रशासनाला नाकीनऊ येत आहेत. ठाकुर्लीचे यार्ड तयार आहे, पण तेथून लोकल सोडणे शक्य होत नाही. वांगणीचे स्टॅबलींग यार्ड तयार आहे. तेथे रात्री लोकल उभ्या राहिल्या तरी वांगणीतील प्रवाशांना त्याचा काहीही फायदा नाही. त्यामुळे प्रवाशांना सुखद-सुरक्षित आणि सुरक्षित प्रवासाची हमीच मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत.
लांबपल्याच्या गाड्या कसारा-कर्जतनंतर कल्याणला थांबतात. वर्षातील बहुतांशी दिवस त्या विविध कारणांनी उशिरा धावतात. त्याचा परिणाम उपनगरी लोकलच्या वेळापत्रकावर होतो. त्यातच या प्रवासात जर त्या गाड्यांचे इंजिन बंद पडणे, अन्य तांत्रिक कारणांची भर पडत असून त्याचा भुर्दंड उपनगरी लोकलवर अवलंबून असलेल्या चाकरमानी, विद्यार्थ्यांना पडतो. त्यासाठी नाशिक-पुणे मार्गे येणाºया लांबपल्ल्यांच्या गाड्या कल्याण यार्डातच थांबवाव्यात, तसेच त्यापुढे रेल्वेने मुंबईपर्यंत उपनगरी रेल्वेचे जाळे विकसित करावे, हे प्रस्ताव माजी खासदार परांजपे यांनी सुचवले होते. ते बासनात का गुंडाळले गेले? बहुतांशी लांबपल्ल्यांच्या गाड्यांमुळे उपनगरी रेल्वे बाधित होत असेल तर कल्याण यार्डातील शेकडो एकर रेल्वेच्या जागेचा रेल्वे बोर्ड, केंद्रीय रेल्वे मंत्रालय गांभिर्याने विचार का करत नाही? हे प्रकल्प वेळीच पूर्ण केले गेले नाहीत. त्यामुळे गर्दी कमी होण्याऐवजी वाढतेच आहे.
प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी त्याची विभागणी करणे, जास्तीत जास्त वेगाने प्रकल्प पूर्ण करणे, नवनवे पर्याय उपलब्ध करणे, यासर्व बाबींचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ अजून तरी आहे. गर्दीचा विस्फोट झाला असून, एल्फिन्स्टन दुर्घटना हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. ती स्थिती गर्दीच्या सर्वच स्थानकांमध्ये कमी अधिक प्रमाणात आहे. रेल्वे प्रशासनाने वेळीच त्याचा विचार करावा. दिवसागणिक सरासरी नऊ ते दहा प्रवाशांचा विविध रेल्वे स्थानकांत विविध कारणांमुळे मृत्यू होतो तर त्याहून अधिक प्रवासी जखमी होत आहेत. ही गंभीर बाब असून त्याकडे कानाडोळा करुन चालणार नाही. अन्यथा ‘लाइफलाइन’ अशी ख्याती असलेली रेल्वे ‘डेथलाइन’ म्हटली जाईल.
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकारण विसरून ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर फेºया वाढल्या तेव्हाच या १६ फेºया वाढवण्याचे ठरले होते. फक्त त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे. पण या फेºया वाढणार हे र्लेवने जाहीर करताच शिवसेना, भाजपा, मनसे आदी पक्षांच्या नेत्यांनी फलक लावून रेल्वेच्या नियोजनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. केवळ सात वर्षांत अवघ्या १६ फेºया म्हणजे वर्षाला सरासरी दोन लोकल फेºयाच पदरात पडल्या. त्यात सात वर्षांत प्रवासी संख्या लाखोंनी वाढली, याकडे लक्ष द्यायला हवे. आता या अपुरेपणाचे श्रेय कोणीतरी घ्यायलाच हवे नाही का?
ठाण्यापुढील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा निर्णय अंमलात आणण्याचे ठरवले आहे. रेल्वेकडील आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मुख्य मार्गावर ठाण्यातून सहा लाख, कळव्यातून ७५ हजार, मुंब्रा येथून ९० हजार, दिव्यातून एक लाख, कोपरमधून ६० हजार, डोंबिवलीतून अडीच लाख, ठाकुर्लीतून २५ हजारांहून अधिक, कल्याणमधील दोन लाख, उल्हासनगर ते बदलापूर तीन लाख, शहाड ते कसारा मार्गावर एक लाख, असे एकूण १८ लाख प्रवासी दररोज मध्य रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांच्या लोंढ्यापुढे वाढीव १६ लोकल फेºया अपुºयाच पडणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची घुसमट वाढतच जाणार आहे.
>समांतर रस्ता, जलवाहतूक
कुठे आहे?
कल्याण-डोंबिवलीचा समांतर रस्त्याचे वर्षानुवर्षे भिजत घोंगडे असून, ते घोडे ठाकुर्लीत अडले आहे. डोंबिवली-ठाणे रेल्वे समांतर रस्त्याचा कुठेही प्रस्ताव नाही. जिल्ह्यातील दळणवळण वेगवान कसे होईल, याचे नियोजन नाही. जलवाहतूक कागदावरच. त्यामुळे विस्तीर्ण खाडीकिनारा रेतीमाफियांना आंदण असून त्यांची मात्र चंगळ आहे.
सगळेच प्रस्ताव बिल्डरधार्जीणे असून सर्वसामान्य प्रवाशांना सुखकर, असे कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलले गेलेले नाही. केवळ उड्डाणपूलांच्या घोषणा, प्रसिद्धी, बॅनरबाजी या चमकोगिरीत सारे अडकल्याचे दिसते. ते करूनही काही कमी पडले तर एकमेकांमध्ये कुरघोडीचे राजकारण करण्यात लोकप्रतिनिधी वेळ दवडत आहेत.

Web Title: From Dadar to Titwala, Dadar to Dombivali, six and Kurla to Kalyan local trains will remain intact.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.