प्रज्ञा म्हात्रे, ठाणेमहागाईच्या वाढत्या झळांपासून त्यातल्या त्यात गारवा देणाऱ्या लालेलाल, पौष्टीक, आरोग्यदायी व स्वस्त आणि मस्त असे जोधपुरी गाजर बाजारात दाखल झाले आहेत. मधूर असल्याने गाजर हलवा व ज्युससाठी त्यांना मागणी वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची विक्री तेजीत असून संपूर्ण ठाण्यात दररोज जवळपास पाच हजार किलो गाजरांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.गेले काही महिने इंदौर व नाशिकच्या नारिंगी रंगाच्या गाजरांनी गर्दी केली होती. या गर्दीत लालेलाल गाजर दिसणे दुर्मिळ झाले होते. परंतु, थंडीची चाहूल लागली आणि लालेलाल अशा जोधपूरी गाजरांनी बाजारात एन्ट्री केली. नोव्हेंबर ते एप्रिल हा मुख्यत्वे जोधपूरी गाजरांचा हंगाम असतो. त्यामुळे दिवाळीनंतर या गाजरांची आवक सुरू झाली असली तरी गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाजर पाहायला मिळत आहे. होलसेल बाजारात ३० ते ३२ रुपये किलोने तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने जोधपुरी गाजरांची विक्री होत आहे. आवक वाढल्याने केवळ बाजारपेठांमध्ये नव्हे तर हातगाड्यांवर देखील जोधपुरी गाजरांचाच रुबाब दिसतो.१गाजराचा एक ग्लास रस संपूर्ण भोजनाची ऊर्जा देणारा असतो. डोळयांसाठी फायदेशीर असणा-या गाजरामध्ये व्हिटॅमिन ए,बी,सी,डी,ई,जी ही जीवनसत्त्वे असतात.२शिवाय हिवाळ््यात गाजराचे सेवन नियमित केल्याने विशेष फायदा होतो असे डॉक्टर सांगतात. त्यामुळेच हा फायदा लक्षात घेता सध्या ठाणेकरांनी आपला मोर्चा बाजारात डेरेदाखल झालेल्या जोधपूरी गाजरांच्या खरेदीकडे वळवला आहे. ३मुख्यत्वे ठाण्यातील हॉटेल व खानावळी व्यावसायिक सलार्ड व कोशिंबीरसाठी तसेच, लोणचे उत्पादक व्यापारी ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाजरांची खरेदी करत असल्याने सध्या त्यांची विक्री तेजीत सुरू आहे.
लालचुटूक गाजरांची रोजची मागणी पाच हजार किलोंची
By admin | Published: December 11, 2015 1:18 AM