सेन्सॉरच्या बैठकीनंतरच निर्णय
By admin | Published: February 9, 2016 02:16 AM2016-02-09T02:16:24+5:302016-02-09T02:16:24+5:30
दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेवर आधारित ‘जयभीम जयभारत’ या नाटकाला रंगभूमी सेन्सॉर बोर्डाने तात्पुरती मान्यता दिल्याने या नाटकाचा पहिला प्रयोग रविवारी कल्याणच्या
- मुरलीधर भवार, कल्याण
दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेवर आधारित ‘जयभीम जयभारत’ या नाटकाला रंगभूमी सेन्सॉर बोर्डाने तात्पुरती मान्यता दिल्याने या नाटकाचा पहिला प्रयोग रविवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात पार पडला असला, तरी त्याचे प्रयोग करण्यास मान्यता द्यायची की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
पहिला प्रयोग पाहण्यासाठी रंगभूमी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांसह काही सदस्य उपस्थित होते. सेन्सॉरने नाटकात काही कट सुचविले होते. पण, ते तसेच ठेवून नाटककाराने प्रयोग सादर केला. मात्र, या नाटकाचे पुढील प्रयोग करायचे की नाही़?, त्याला मान्यता द्यायची की नाही?, याविषयीचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे सांगून त्याविषयी तूर्तास काही भाष्य करणे सेन्सॉरच्या प्रतिनिधींनी टाळले. प्रयोग चांगला झाला, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. जनार्दन जाधव यांनी लिहीलेल्या नाटकाचे रतन बनसोडे त्याचे निर्माते आहेत, तर सूत्रधार सुबोध मोरे आहेत.
या नाटकात आंबेडकरांचा अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संवाद साधतो, अशी रचना असून हा संवाद काल्पनिक आहे. सेन्सॉर बोर्डाकडे नाटकाच्या प्रयोगाची मान्यता घेण्यासाठी आम्ही अर्ज केला, तेव्हा त्यांनी संहितेत १९ कट सुचविले. नाटकातील रमाबाई आंबेडकर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड हे शब्द वगळण्यात यावेत. जातीवाद, हिंदुत्व, नामदेव ढसाळ यांचा गांडू बगीचा, कुत्रा असे शब्द काढण्याची सूचना केली. ‘कुत्र्या’ऐवजी ‘श्वान’ हा शब्द टाकावा. जातीयवादाऐवजी दलितविरोधी, ‘हिंदुत्वा’ऐवजी ‘सत्ता’ असे शब्द वापरण्याची सूचना सेन्सॉरच्या सदस्यांनी केली, अशी माहिती नाटकाचे सूत्रधार मोरे यांनी दिली.
नाटकाच्या या प्रयोगाला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे, सदस्य अशोक समेळ, गिरीश दाबके, प्रसाद ठोसर उपस्थित होते. या नाटकात १९ बदल सुचविणारे लेखी पत्र नाटकाच्या लेखकांना दिले होते. त्यांनी कट मान्य करतो, असे सांगितल्यावर त्यांना प्रयोगाच्या सादरीकरणाची तात्पुरती मान्यता दिली. त्याचा प्रयोग आम्ही पाहिला आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा, हे ठरविण्यासाठी १८ फेब्रुवारीला बोर्डाची बैठक होईल, असे प्रतिनिधींनी सांगितले. प्रयोगाला उपस्थित असलेले भाकपाचे नेते उदय चौधरी म्हणाले, नाटकात सेन्सॉर करण्यासारखे काहीच नाही. ही एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याची चर्चा सध्या होत आहे.
ही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी
यापूर्वी ‘जयभीम कॉम्रेड’ हा आनंद पटवर्धन यांचा चित्रपट येऊन गेला आहे. प्रज्ञा लोखंडे यांचे ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक आले आहे. खैरलांजीवर चित्रपट येऊन गेला आहे. ढसाळांच्या गांडू बगीचावर नाटक आलेले आहे.
या सगळ्या कलाकृतींना सेन्सॉरचा कोणताही अडसर आला नाही. विवेकानंदांच्या जीवनावर ‘संन्यस्तखड््ग’ हे नाटक आमदार संजय केळकर करतात. हे सगळे चालते. पण, आता सेन्सॉर बोर्डावरील मंडळीच हिंदुत्ववादी असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.