मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये सत्ताधारी भाजपच्या काळात विकास एका व्यक्तीचा झाला. त्याच्यामुळे या शहराची देशभर बदनामी झाली. मनमानी व शहर ओरबाडणाऱ्या त्या व्यक्तीला अखेर शहरातील जनतेने धडा शिकवला. यापुढे आम्ही बहीणभाऊ मिळून पालिकेतील सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचार संपवून टाकू आणि शहराला विकास व प्रगतीच्या दिशेने नेऊ, असा निर्धार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.गीता जैन यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आ. सरनाईक व आ. जैन यांनी महापालिका मुख्यालयात येऊन सेनेचे नगरसेवक-पदाधिकारी आदींची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या कार्यकाळात भ्रष्टाचार, मनमानी व अनेकांच्या आर्थिक हिताचे ठराव केले जात आहेत. पालिकेच्या कामात २३ ते २८ टक्के खाल्ले जात आहेत. परिवहन सेवा ठेका, उद्याने देखभाल दुरुस्ती, बीएसयूपी योजनेच्या निविदा आदींमध्ये सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. मात्र, महाविकास आघाडीच्या कार्यकाळात भाजपचे सर्व मनसुबे उधळून लावले जात आहेत.भाजपचे १५-२० नगरसेवक संपर्कात असून आ. गीता जैन सेनेत आल्याने भाजपला आणखी फटका बसेल. गीता यांनी जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करणे आता सेनेची जबाबदारी आहे. मीरा-भाईंदर पालिकेवर सेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न २०२२ मध्ये पूर्ण करणार आहोत, असे सरनाईक म्हणाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे आदर्श आहेत. राजकारणात येण्याची प्रेरणा भारतरत्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जनतेची कामे करणार असून, दुराचारी, अत्याचारी व भ्रष्टाचारी प्रवृत्तींचाही शिवसेनेच्या धनुष्यबाणाने संहार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे जैन म्हणाल्या.
पालिकेतील भ्रष्टाचार संपवून शिवसेनेचा भगवा फडकवणार, प्रताप सरनाईक, गीता जैन यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:27 AM