बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या आर्ट गॅलरीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:09 AM2020-10-27T01:09:48+5:302020-10-27T01:10:10+5:30
Badlapur News : बाळासाहेबांच्या नावाला साजेशी अशी आर्ट गॅलरी असून, याद्वारे बाळासाहेबांची अनेक छायाचित्रे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
बदलापूर : बदलापुरात चैतन्य संकुल परिसरात आर्ट गॅलरीचे लोकार्पण शिवसेना शहरप्रमुखांच्या हस्ते करण्यात आले आहे. बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणाऱ्या या आर्ट गॅलरीला नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बाळासाहेबांच्या नावाला साजेशी अशी आर्ट गॅलरी असून, याद्वारे बाळासाहेबांची अनेक छायाचित्रे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
बदलापूर नगर परिषदेच्या पुढाकाराने शिरगावातील चैतन्य संकुल परिसरात पडीक अवस्थेत असलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या नावाने आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीत बाळासाहेबांच्या जीवनपटावर आधारीत छायाचित्रांची मांडणी करण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही गॅलरी असल्याने या ठिकाणी अनोखे असे सेल्फी पॉइंटदेखील उभारण्यात आले आहे. अत्यंत सुबक पद्धतीने ही गॅलरी उभारण्यात आली असून तिचे लोकार्पण शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
बदलापूर शहर वाढत असताना येथे वास्तव्यास येणाऱ्या बदलापूरकरांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत यावेळी म्हात्रे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही आर्ट गॅलरी न्याहाळताना अनेक जुन्याजाणत्या शिवसैनिकांनी जुने दिवस आठवल्याचे सांगितले.