ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा पाहता, ठाणे जिल्ह्यातील शाळा नियमित सुरू करण्याची मागणी ठाणे जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद लुटे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामीण भागातील वाडी-वस्तींवर ऑनलाईन साधनांचा अभाव व तांत्रिक अडचणी पाहता, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पर्याय होऊ शकत नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात आठवीपासूनचे वर्ग सुरळीत सुरू आहेत. ऑनलाईन शिक्षणातील अडचणी पाहता, अनेक शिक्षक गावातील एखाद्या घरात, समाजमंदिरात प्रत्यक्ष शिक्षण देत आहेत. पहिलीची मुले दुसरीत गेली, परंतु त्यांनी शाळा पाहिलेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या विकासावर होणारे दूरगामी विपरित परिणाम पाहता, निदान ठाणे जिल्ह्यात लवकर शाळा सुरू करण्याची आवश्यकता निवेदनात नमूद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे विशेष मोहिमेद्वारे वेगाने लसीकरण करण्यात यावे, सर्व जिल्हा परिषद शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक साधने ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात यावी आणि पूर्वीप्रमाणेच मध्यान्ह भोजन योजना कार्यान्वित करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.