मीरारोड - १ जून पासून मासेमारीला शासनाने बंदी घातलेली असताना देखील रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारी चालविल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल कारण्यासह त्यांच्या बोटी जप्त करून नोंदणी रद्द करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्या कडे केली आहे .
समिती तर्फे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, सचिव संजय कोळी, युवा कार्याध्यक्ष मनीष वैती, पालघर जिल्हा अध्यक्ष . विनोद पाटील, उत्तम भागातून स्टीफन कासुघर व कासलिन डाँगरकर तर वसई भागातून मिल्टन सौध्या, ब्लेस जन्या, संजू मानकर आदी सदस्य यांनी शुक्रवारी पाटणे यांची भेट घेतली. यावेळी बेकायदा मासेमारी बद्दल उपस्थित होते
२०२४ सालचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू असताना रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारीचे सत्र सुरू ठेवले असल्याने माश्यांच्या प्रजनन आणि संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या गलबती समुद्रात वादळी वाऱ्याने बुडाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते.
अवैध मासेमारी करणाऱ्या गलबतीवर नौकेचे नंबर पुसून मासेमारी करीत असल्याचे गेल्यावर्षी दिसून आले होते. अशा प्रकारच्या अवैध मासेमारीमुळे देशाची सागरी सुरक्षा धोक्यात येऊ शकते. जर मासेमारी होत असल्याचे पाकिस्तानी यंत्रणांच्या निदर्शनास आले तर मुंबईत मोठा आतंकवादी हल्ला नाकारता येणार नाही. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या मच्छीमार बोट मालकांवर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करा.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आणि अवैध मासेमारीला आळा घालण्याकरिता, अवैध मासेमारी करणाऱ्या बोटी जप्त करून त्या बोटींच्या रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावेत. रेती उत्खनन करण्याऱ्या बोटींना ज्याप्रमाणे महसूल विभागाकडून फोडून टाकण्यात येतात त्याच धर्तीवर पावसाळी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना फोडून टाकण्यात यावे. अवैध मासेमारी करणाऱ्या नौका मालकांवर, खलाश्यांवर, मासे विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी यावेळी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत समितीच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील परवाना अधिकारी यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी दिली आहे