दृष्टिहीन असूनही निसर्गोपचारात मिळविले प्राविण्य,किडनीच्या कर्करोगावरही प्रचंड इच्छाशक्तीतून केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:49 AM2017-10-24T03:49:05+5:302017-10-24T03:49:34+5:30
डोंबिवली : जन्माने डोळस असलेल्या सुभाष वारघडे सायकलवरुन पडले आणि या अपघातात त्यांची दृष्टी गेली. त्यावर मात करून आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला.
मुरलीधर भवार
डोंबिवली : जन्माने डोळस असलेल्या सुभाष वारघडे सायकलवरुन पडले आणि या अपघातात त्यांची दृष्टी गेली. त्यावर मात करून आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला. निसर्गोपचारातून या कर्करोगावर त्यांनी मात केली आणि पुढे निसर्गोपचार या विषयात कोलकत्ता विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली आहे. निसर्गोपचारात डॉक्टरेट मिळविणारे ते देशातील पहिले दृष्टीहीन आहेत.
वासिंद रेल्वे स्थानकापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीवली गावात वारघडे राहतात. त्यांचा जन्मही या गावातीलच. घरची परिस्थिती बेताचीच; पण त्यावर मात करुन त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवी शिक्षण घेतल्यावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. त्यात ते यशस्वी ठरले. दरम्यानच्या काळात सायकलवरुन पडून त्यांना अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांची दृष्टी गेली. पण खचून न जाता त्यांनी निसर्गोपचाराच्या शिक्षणाला सुरुवात केली.
अंधत्वावर मात करण्यासाठी त्यांनी महालक्ष्मी येथील अंधत्व पुनर्वसन केंद्रात जाऊन ब्रेल लिपी शिकण्यास सुरुवात केली. डॉक्टर भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅक्युपंचर, मसाज याचे शिक्षण घेतले. नाशिकच्या आरोग्यधामात निसर्गोपचाराचा डिप्लोमा केला आणि २०१३ साली शहापूर व खारबाव येथे निसर्गोपचार केंद्र सुरु केले. हा सगळा प्रपंच सुरु असताना त्यांच्यावर आणखी एक संकट ओढवले. २०१४ साली वारघडे यांना किडनीचा कर्करोग झाला. उपचारासाठी त्यांनी टाटा कर्करोग रुग्णालयात धाव घेतल्यावर तपासणीत दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वारघडे यांनी निसर्गोपचाराच्या माध्यमातून स्वत:च्या कर्करोगावर स्वत:च उपचार सुरु केले आणि दीड वर्षात त्यांना या कर्करोगावर पूर्ण मात करता आली. त्यानंतर वारघडे हे नॅशनल असोशिएशन फॉर ब्लार्इंड या दृष्टीहीनांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेत गेले. तेथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. निसर्गोपचाराच्या अनुभवातून त्यांनी डॉक्टरेट मिळविण्यासाठी डोंबिवलीतील निसर्गोपचार महाविद्यालयात प्रवेश घेतला. कोलकत्ता विद्यापीठातून वारघडे यांना नुकतीच डॉक्टेरटही मिळाली. डॉक्टर आॅफ मेडिसीन (अल्टरनेट मेडिसन) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अंध व्यक्तीने निसर्गोपचारात डॉक्टरेट मिळविण्याचा पहिला मान वारघडे यांना मिळाला.
>डोळसांच्या डोळ््यात अंजन
ज्या निसर्गोपचाराने त्यांना उपजीविकेचे साधन दिले. कर्करोगावर मात करण्याचे बळ दिले आणि डॉक्टरेटही मिळवून दिली, त्यातूनच ते चरितार्थ चालवतात.
त्यांच्या पत्नी अंजना डोळस आहेत. मुलगा प्रथमेश चौथीत आणि लहान मुलगा प्रतिक पहिलीत शिकतो. जन्माने डोळस असलेल्या व नंतर अपघाताने अंधत्व आलेल्या वारघडे यांनी या व्यंगावर मात करत डोळसांच्या डोळ््यात अंजन घातले आहे.