कल्याण : भाजपाचे माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांच्या काही भागीदारांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये ६५ कोटींपेक्षा अधिक अघोषित संपत्ती आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील दोन महिन्यांमध्ये ठाणे प्राप्तिकर विभागाने केलेली ही तिसरी मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. दरम्यान, ‘लोकमत’ने याप्रकरणी गायकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत भाष्य करण्यास नकार दिला.भाजपाचे कल्याण पश्चिमचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक अशी पदे भूषवलेले गायकर हे काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. मूळचे बांधकाम व्यावसायिक असलेल्या गायकर यांच्याकडे सध्या कल्याण-डोंबिवलीतील एक प्रथितयश विकासक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या कार्यालयावर पडलेले छापे आणि त्यात आढळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अघोषित संपत्तीमुळे एकच खळबळ उडाली आहे.ठाणे प्राप्तिकर विभागाची ही कारवाई चार दिवस सुरू होती. यात गायकर आणि त्यांच्या भागीदारांच्या कार्यालयांवर एकूण २० ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यात ६५ कोटींपेक्षा अधिक अघोषित संपत्तीचे पुरावे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये टीडीआर व्यवसायातील रोख व्यवहार तसेच फलॅट खरेदीदारांकडून स्वीकारलेल्या रोख रकमांसंबंधीच्या पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. प्राप्तिकर विभागाच्या १३० जणांच्या पथकाने एकाच वेळी २० ठिकाणी हे छापे टाकले. दरम्यान, या छापेसत्रामुळे अन्य विकासकांचेही चांगलेच धाबे दणाणले आहे.
विकासकांवर टाकले प्राप्तिकर विभागाने छापे, ६५ कोटींपेक्षा मोठी रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:04 AM