'गरजू महिलांसाठी 'धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना' सुरू करावी'
By अजित मांडके | Published: March 3, 2023 05:08 PM2023-03-03T17:08:14+5:302023-03-03T17:08:29+5:30
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी दरवर्षी समाज विकास विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ गरजू महिला घेत आहेत.
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गरीब गरजू व आर्थिकदृष्टया मागास महिलांना घरघंटी, शिवणयंत्र व मसाला कांडप मशीन यंत्र खरेदीकरिता थेट अर्थसहाय्य देण्याबाबतची योजना नव्याने महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबवावी व या योजनेस धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना हे नाव द्यावे या मागणीचे पत्र शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के व शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांची भेट घेवून दिले.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी दरवर्षी समाज विकास विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ गरजू महिला घेत आहेत. या योजनांची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून जास्तीत जास्त महिलांना योजनांचा लाभ घेता यावा व वैयक्तिक स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी घरघंटी, शिवणयंत्र व मसाला कांडप मशीन उपलब्ध करुन दिल्यास याचा लाभ निश्चितच महिलांना होणार असून तशी मागणी देखील महिलांनी केली असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने या योजनेतंर्गत विधवा, परित्यकता, घटस्फोटित, ४० वर्षावरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्य रेषेखालील प्रमाणपत्रधारक, सर्वसाधारण महिला व कोविड या आजाराने ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांचा समावेश करण्यात आला आहे. याच धर्तीवर ठाणे महानगरपालिकेनेही ही योजना 'धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना' या नावाने सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.