बदलापूर : बदलापूरमध्ये बुधवारी झालेल्या इको सायक्लोथॉन राज्यस्तरीय स्पर्धेवर यंदा पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले. सांगलीचा दिलीप माने विजेता ठरला. सांगलीचाच प्रकाश ओलेकर याने दुसरा क्र मांक पटकावला. तर, रायगडचा श्रीकांत पाटील याने तिसरा क्रमांक मिळवला. महिला गटात पुण्याच्या कोमल देशमुखने पहिला क्रमांक पटकावला.
सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, असा संदेश देऊन नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा हौशी सायकल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे नगरसेवक शैलेश वडनेरे नऊ वर्षांपासून बदलापूरमध्ये ही स्पर्धा भरवत आहे. सकाळी साडेसहा वाजता बदलापूर गाव येथून स्पर्धेला सुरुवात झाली. १५ ते ५० वयोगटांतील महिला व पुरु ष गट, जिल्हास्तरीय स्पर्धा १७ वर्षांखालील मुलामुलींसाठी एक गट आणि शहरपातळीवरील १४ वर्षांखालील मुले आणि मुली यांचा एक गट अशा सहा गटात ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत पुरुष गटासाठी बदलापूर गाव ते म्हसा हे ४८ किलोमीटरचे अंतर, महिला गटासाठी बदलापूर गाव ते सांबारी हे १८ किलोमीटर, १७ वर्षांखालील गटासाठी बदलापूर गाव ते सोनवळा व १४ वर्षांखालील गटासाठी बदलापूर गाव ते मूळगाव हे अंतर होते. या स्पर्धेत बदलापूर गाव ते म्हसा हे अंतर एक तास नऊ मिनिटे २६ सेकंदांत पार करणारा दिलीप माने विजेता ठरला. तर, ५३ मिनिटे ३३ सेकंदांत बदलापूर गाव ते सांबारी हे १८ किलोमीटरचे अंतर कापणारी कोमल देशमुख महिला गटात विजेती ठरली. सांगलीच्या प्रियंका कारंडेने दुसरा, तर मुंबईच्या प्रिया दाबेलिया हिने तिसरा क्र मांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आयुष खुराणा याने प्रथम, ओम महाजन याने द्वितीय व निसर्ग भामरे याने तृतीय क्र मांक पटकावला. मुलींच्या गटात मुंबईच्या सष्ना कोकाटे हिने प्रथम, तर नाशिकच्या ऋतू भामरे व वसईच्या सेनोरी लिपीस हिने अनुक्र मे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कल्याणच्या हर्ष राणे याने प्रथम, तर बदलापूरच्या मणिंदर सिंग व ठाण्याच्या श्रेयांश बरण यांनी अनुक्र मे द्वितीय व तृतीय क्र मांक पटकावला.