लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भावजयीचे निधन झाल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या लौटन सोनकर (५२) या भाजी विक्रेत्याने ठाण्यातील मानपाडा तत्वज्ञान विज्ञापिठाजवळील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ठाणे अग्निशमन दलाने त्याचा मृतदेह काढून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला.धर्मवीरनगर येथे राहणारा लौटन हा कपडे शिवण्याचा तसेच भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होता. १ नोव्हेंबर रोजी गावी त्याच्या भावजयीचे निधन झाले होते. त्याआधी त्याच्या भावाचेही निधन झाले होते. आता भावांच्या मुलांचे कसे होणार याच विवंचनेत तो होता. कोरोनाच्या साथीमुळे त्याला गावी जाता आले नाही. या सर्वच कारणांमुळे तो वैफल्यग्रस्तही झाला होता. दरम्यान, ७ नोव्हेंबर रोजी तो घरातून अचानक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात त्याच्या मुलाने तक्रारही दिली होती. त्याचा शोध सुरु असतांनाच २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह तत्वज्ञान विज्ञापिठाजवळील तुळशीधाम, मानपाडा भागातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी हा मृतदेह काढून नातेवाईकांकडे सुपूर्द केला. धर्मवीर नगरातील निवारा सोसायटीमधील आठव्या मजल्यावर तो वास्तव्याला होता. त्याच्या मागे विवाहित मुलगा,सून, विवाहित मुलगी, जावई आणि पत्नी असा परिवार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश मोहिते हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत....................