आसनगाव : कोरोना महामारीत राेजगार हिरावल्याने अनेक कुटुंबांना वीजबिल भरता आले नव्हते. हे थकलेले वीजबिल टप्प्याटप्प्याने (पार्ट पेमेंट) भरण्याची सूट मिळाल्याने आता त्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशाेक इरनक यांनी पाठपुरावा केला.
थकीत बिलाची रक्कम एकदम भरणे शक्य नसल्यामुळे या कुटुंबांना पार्ट पेमेंटची सुविधा देण्याची मागणी इरनक यांनी मंगळवारी कल्याण महावितरणचे मुख्य अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली हाेती. मात्र, शासन निर्णयामुळे हा अधिकार अभियंत्यांना नसल्याने ही सूट देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेर, इरनक यांनी पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन या कुटुंबांची व्यथा मांडली. त्यानंतर पाटील यांनी तत्काळ कल्याणच्या मुख्य अभियंत्यांना दूरध्वनी करून वीजबिल भरण्यासाठी पार्ट पेमेंटची सूट देण्याची सूचना केली. ती मान्य झाल्याने ग्राहकांना माेठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पार्ट पेमेंटवर व्याज आकारू नये अशी ग्राहकांची मागणी आहे.