अनगाव : ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनाही सहन कराव्या लागत आहेत. हंडांभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे; नागरिक पाण्यासाठी आक्र मक झाले असून, याबाबत लोकमतने दुष्काळदाह सदराच्या माध्यमातून चालवलेल्या मालिकेची दखल घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी पाणीटंचाईसंबंधी आढावा बेठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठक होणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.ठाणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खड्ड्यांतील दूषित पाणी ग्रामस्थांच्या नशिबी आले असून, ही विदारक परिस्थिती लोकमतने मांडल्यानंतर यंत्रणेला जाग आली. भिंवडीचे आमदार शांताराम मोरे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना धारेवर धरत ग्रामसेवकांची तातडीची बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला.या पाणीटंचाईची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, तानसा, वैतरणा, भातसा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक बोलावली आहे. यावेळी पाणीटंचाईचा आढावा घेऊन काय उपाययोजना केल्या आहेत, पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाय यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईसंबंधी ज्या विभागाने दुर्लक्ष केले आहे, त्यांची बैठकीआधीच दमछाक झाली आहे.
जिल्हाधिकारी घेणार आज पाणीटंचाईचा आढावा; प्रशासकीय यंत्रणा कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:27 AM