ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत होता. त्यातही २० दिवसांत केवळ चारवेळाच लसींचा साठा मिळाला होता. आता पाचव्यांदा ठाणे जिल्ह्यासाठी कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून बंद असलेली लसीकरण मोहीम आता पुन्हा सुरू होणार आहे. ठाण्यात मागील आठवडाभरात केवळ दोनच दिवस लसीकरण सुरू होते. आता जिल्ह्याला १ लाख ४३ हजार लसींचा साठा प्राप्त झाल्याने लसीकरण मोहीम नव्या दमाने सुरू होणार आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८ लाख ३४ हजार ९८३ जणांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये १८ लाख ९७ हजार ९० जणांना पहिला, तर केवळ १० लाख ९ हजार ३४६ जणांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे. जुलै महिन्यापासून लसीकरणाचा वेग फारच मंदावला आहे. आठवड्यातून एक ते दोन दिवसच लसीकरण होताना दिसून आले.
................
पालिका - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन
ठाणे - २७५०० - २५००
केडीएमसी - २३६०० - २२००
नवी मुंबई - १९६५० - १८००
मीरा-भाईंदर - १४४०० - १३००
उल्हासनगर - ५२०० - ५००
भिवंडी - ७९०० - ७००
ग्रामीण - ३२७५० - ३०००
-------------------------------------------------------------
एकूण - १३१००० - १२०००