जिल्हा नियोजन समितीची बैठक २० जानेवारीला; नव्या लोकप्रतिनिधींची पहिलीच बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:17 AM2020-01-17T00:17:36+5:302020-01-17T00:18:09+5:30
शहरी व ग्रामीण भागातील विविध विकास कामांना मंजुरीपासून विकासाबाबतचे योग्य निर्णय, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात येतात.
ठाणे : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक २० जानेवारीला होणार आहे. ही बैठक जवळपास एक वर्षानंतर होणार असून यामध्ये दोन्ही निवडणुकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी (खासदार-आमदार) पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिधिनी आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरी व ग्रामीण भागातील विविध विकास कामांना मंजुरीपासून विकासाबाबतचे योग्य निर्णय, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात येतात. त्यात मागील वर्षी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आणि तिची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्ह्यातील विकासकामांसाठीच्या निविदा तसेच इतर प्रक्रि या पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. जिल्ह्यासाठी तयार केलेल्या सुमारे ४१८ कोटी २० लाख रु पयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागला होता. या सर्व राजकीय घडामोडींमुळे जिल्हा नियोजन समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक होऊ शकली नाही.
आता मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर बैठक घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ती २० जानेवारी रोजी लावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या बैठकीत जिल्हा नियोजन आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच संबंधितांना या बैठकीची माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली असून ही बैठक निवडणुकीनंतर आणि नवीन वर्षातील पहिलीच बैठक असल्याने तितकीच महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली.
या आमदारांची पहिली बैठक
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांतून तिघे जण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मनसेचे प्रमोद (राजू) पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून गीता जैन यांचा समावेश आहे.
आजी-माजी पालकमंत्री दिसणार एकत्र
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री होण्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. तर, गणेश नाईक यंदाच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे आणि नाईक हे आजी-माजी पालकमंत्री बैठकीनिमित्त एकत्र सभागृहात दिसणार आहेत.