ठाणे : ब्रह्मांड कट्टा हा सामाजिक जाणीव ठेवून नेहमीच मदतीचा हात पुढे करत आलेला आहे. स्वरश्री प्रतिष्ठानतर्फे अंध, अपंग, मतिमंद आणि मूकबधिर कलाकारांना घेउन ‘आनंदयात्री’ या नावाने कार्यक्रम केला जाताे. हा कार्यक्रम काेराेनामुळे थांबल्यामुळे ही संस्था आणि या दिव्यांग मुलांचा खर्च चालवताना कसरत करावी लागत आहे. या मुलांच्या मदतीसाठी ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी पुढाकार घेत कार्यकारी समिती आणि सदस्यांद्वारे सुमारे २५ हजार रुपयांची मदत जमा केली.
आनंदयात्री कार्यक्रमाचे आतापर्यंत संपूर्ण देशात ७०० प्रयाेग झालेले असून या प्रयाेगांच्या माध्यमातून आणि देणगीतून या संस्थेचा खर्च चालवला जाताे. मात्र काेराेनामुळे हा कार्यक्रम थांबल्यामुळे या दिव्यांग मुलांवर हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. श्रद्धा देसाई आणि प्रमाेद कांबळी हे स्वरश्री प्रतिष्ठान ही संस्था चालवतात. मात्र काेराेनाच्या संकटामुळे या कार्यक्रमाचे प्रयाेग थांबल्यामुळे आवश्यक असणारे अन्नधान्य, वैद्यकीय, शैक्षणिक व तर आवश्यक खर्च भागवताना संस्थेला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे देसाई व कांबळी यांनी म्हटले होते. हे कळताच ब्रह्मांड कट्ट्याचे जाधव यांनी मदतीसाठी आवाहन करून २५ हजारांची मदत जमा केली. ब्रह्मांड कट्टाची अंतर्गत संस्था संगीत कट्ट्याचे अध्यक्ष अरुण दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी माेलाचे याेगदान दिले. संगीत कट्ट्याच्या सदस्या तन्वी हुलावले यांनी अन्नधान्य व भाजीपाला या स्वरूपात मदत केली. दरम्यान, गेल्या वर्षी ग्रुपचा सभासद गायक मंगेश भोईर कोरोनाग्रस्त असताना त्याला संगीत कट्ट्याच्या सदस्यांनी ७० हजार रुपयांची मदत करून आर्थिक आणि जीवावरच्या संकटातून बाहेर काढण्यास मदत केली हाेती.