आमिर खान गीतकाराला स्वातंत्र्य देतो का...? स्वानंद किरकिरे सांगणार गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 05:53 AM2024-02-27T05:53:43+5:302024-02-27T05:54:16+5:30
आज लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा रंगणार.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : 'थ्री इडियट्स' असो किंवा 'लगे रहो मुन्नाभाई'... अथवा 'बर्फी'..! या चित्रपटांतील गाणी लिहिणारे, दोन वेळा गीतलेखनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले, ज्येष्ठ गीतकार स्वानंद किरकिरे हे अभिनेता व निर्माता आमिर खान गीतकाराला स्वातंत्र्य देतो की नाही? याची पडद्यामागची गोष्ट उलगडून दाखवणार आहेत. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये स्वानंद किरकिरे यांच्या मुलाखतीची मेजवानी समस्त रसिकांना आज मिळणार आहे.
लोकमत साहित्य महोत्सवाचा समारोप मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज, २७ फेब्रुवारी रोजी ठाण्यात होत आहे. ज्येष्ठ लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव होईल. भटकळ यांच्याशी प्रख्यात कवी व अभिनेते किशोर कदम संवाद साधतील. भटकळ यांनी कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांना कसे शोधून काढले. याचे गुपितही आज या कार्यक्रमातून उलगडले जाईल.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 'थ्री इडियट्स'मधील गाणी किती वेळा बदलली? इथपासून ते चाल आधी तयार होते की गाण्याचे शब्द आधी लिहिले जातात, या प्रश्नांसह मुलाखतीच्या निमित्ताने वेगळी माहितीही ऐकायला मिळेल. स्वानंद किरकिरे यांच्याशी अपर्णा पाडगावकर संवाद साधणार आहेत. प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव हे यावेळी अक्षर संवादाच्या निमित्ताने व्यासपीठावरून अक्षर लेखनाचे अनोखे प्रात्यक्षिक करतील. संस्कृती फाउंडेशनच्या ज्योती मोतलिंग - सावंत त्यांचा चमू अनोखी सरस्वती वंदना सादर करेल.
प्रवेशिका येथे मिळतील
या कार्यक्रमाच्या प्रवेशिका ठाण्यात गडकरी रंगायतन येथे सकाळी १०.३० पासून मिळतील,