लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या संकटकाळातही बँकेच्या कर्मचाऱ्यांचे हित साधणारा वेतन करार, ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघ व डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनात अलीकडेच संपन्न झाला. एप्रिल, २०२१ ते मार्च, २०२४ या तीन वर्षांसाठी हा वेतन करार करण्यात आला असून, या करारामुळे कर्मचाऱ्यांना ११ टक्के वेतनवाढ मिळाली आहे. या वेतनवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात दीर्घ मुदतीचे गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज उपलब्ध होणार आहे.
ठाणे जिल्हा कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या करारासंबंधात जी प्रगल्भता दाखविली ती निश्चितच कौतुकास पात्र आहे. व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांनी एकमेकांशी लढण्याची मनस्थिती सोडून, दोघांनी मिळून आव्हानात्मक अशा परिस्थितीला एकत्रित ताकदीने व एकदिलाने सामोरे जाणे आवश्यक आहे. हे डोंबिवली बँकेत प्रत्यक्षात घडत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही उभयपक्षी अत्यंत सकारात्मक व सामंजस्याची भूमिका घेत, अत्यंत कमी कालावधीत व सौहार्दपूर्ण चर्चेने हा करार संपन्न झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे यांनी दिली.
कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता, उद्योग व्यवसायावर आलेली संकटे, कोरोनाकाळात अनेकांना गमवावे लागलेले रोजगार या पार्श्वभूमीवर बँक व्यवस्थापनाने वेतनातील वाढीचा करार करणे व तेही तत्परतेने करणे, हेच मुळात अभिनंदनीय असून, वेतनवाढीबाबत संचालक मंडळाबरोबर झालेल्या एकाच बैठकीत हा वेतन करार संपन्न झाला. ही कर्मचारी संघटन क्षेत्रासाठीही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे यांनी केले. याप्रसंगी बँकेचे मान्यवर संचालक, व्यवस्थापकीय अधिकारी व ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
..........
वाचली