डोंबिवली : मराठी भाषेतील विज्ञान पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 02:58 PM2018-01-20T14:58:22+5:302018-01-20T14:59:22+5:30
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवलीतर्फे वाचनसंस्कृती वाढावी याकरिता मराठी भाषेतील विज्ञानाची पुस्तके आणि वैचारिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे
डोंबिवली- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवलीतर्फे वाचनसंस्कृती वाढावी याकरिता मराठी भाषेतील विज्ञानाची पुस्तके आणि वैचारिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. टिळकनगर शाळेच्या पटांगणात या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 21 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
डोंबिवलीतील 15 शाळांना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. साधारणपणो अडीच हजार पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. रेणु दांडेकर, अच्युत गोडबोले, सुबोध जावडेकर, यासारख्या प्रथितयश लेखकांची पुस्तके या प्रदर्शनाता पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनात 50 टक्के पुस्तके ही मराठी भाषेतील आहेत. मराठी भाषेत लिहिलेली विज्ञानाची पुस्तके फार कमी आहेत. इंग्रजी भाषेत मात्र विज्ञानाच्या पुस्तकांवर विपुल लेखन झाले आहे. मराठी भाषेतील विज्ञानाच्या पुस्तकांची निर्मिती व्हावी हा देखील एक उद्देश हे प्रदर्शन भरविण्यामागे असल्याचे शाळेचे पदाधिकारी अविनाश बोंद्रे यांनी सांगितले.
या प्रदर्शनात मूलभूत विज्ञान, खगोलशास्त्र व आकाश निरीक्षण, शरीरशास्त्र आणि आरोग्य, पर्यावरण निसर्ग, प्रयोग-प्रकल्प का व कसे, वैज्ञानिक चरित्रे, विज्ञानाचा इतिहास, विज्ञान कथा, चरित्रे, माहितीपर, सामान्य ज्ञान, गणित इत्यादी विषयांची पुस्तकांची मांडण्यात आली आहे.