बांधकाम व्यावसायिकावर डोंबिवलीत गोळीबार, उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:02 AM2018-01-14T04:02:54+5:302018-01-14T04:03:07+5:30
उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून नांदिवलीत राहणाºया एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर २० ते २५ जणांनी शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र हल्ला करत गोळीबार केला. मात्र, त्यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली : उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून नांदिवलीत राहणाºया एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर २० ते २५ जणांनी शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र हल्ला करत गोळीबार केला. मात्र, त्यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवलीतील गोळीबाराचे सत्र संपत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
गीतेश पाटील यांनी महेंद्र खोत (रा. आगासन, दिवा) यांना साडेतीन लाख रुपये उसने दिले होते. ते पैसे पाटील यांनी त्यांच्याकडे परत मागितले. त्या रागातून खोत हे आगासन येथे राहणारे केजू मुंडे, निलेश मुंडे, शरद मुंडे तसेच सोनारपाडा येथील १५ ते २० साथीदारांना घेऊन मध्यरात्री १ वा.च्या सुमारास पाटील यांच्या घरी आले. स्टम्प, हॉकीस्टीक, तलवारी घेऊन आलेल्या या हल्लेखोरांनी पाटील यांचा दरवाजा ठोठावला. या वेळी पाटील टीव्ही पाहण्यात मग्न होते. हल्लेखोरांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितले. ‘आज जिवंत सोडणार नाही. त्याचा मुडदा पाडू तेव्हाच घरी जाऊ’, असे ओरडत पाटील यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. तर, एकाने पिस्तूलने पाटील यांच्या दिशेने गोळीबार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी पाटील यांची आई घराचा दरवाजा उघडून बाहेर गेली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या हल्लेखोरांना पाटील यांचे मित्र समजावत असताना हल्लेखोरांतील एकाने त्याच्याजवळील पिस्तूलने हवेत दोनदा गोळीबार केला. त्याचबरोबर पाटील यांच्या मदतीला येणाºयास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.