कल्याण : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. आज ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
लवकरच कल्याणवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गामुळे भिवंडी आता मुंबईशी जोडली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम कमी वेळेत पूर्ण करणार आहे. यामुळे येत्या पाच वर्षांत एक कोटी प्रवाशांची सोय होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रो मार्गाने जोडण्यात यावे. यासंदर्भात रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रो मार्ग लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी, डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई नवीन मेट्रो मार्गांचे लवकरच डीपीआर तयार करून त्याला तातडीने मंजुरी दिली जाणार, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.