दुर्गंधीने डोंबिवलीकरांची पहाटेच झोपमोड; पहाटे साडेचार ते सकाळी आठ वाजेपर्यंत उग्र दर्प
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:12 AM2019-12-12T02:12:08+5:302019-12-12T02:12:51+5:30
महिला, लहान मुले, ज्येष्ठांना उलट्या, मळमळण्याचा त्रास
डोंबिवली : शहर व आजूूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरणाऱ्या गॅसच्या दुर्गंधीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. बुधवारी पहाटे एमआयडीसी भागातून झालेल्या उग्र दर्पामुळे डोंबिवलीकरांची झोपमोड झाली. पहाटे साडेतीन ते साडेचार वाजेपर्यंत आणि सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत हा गॅसचा वास अत्यंत त्रासदायक होता. अनेकांना आपल्या घरातील गॅसची गळती तर सुरु नाही ना, अशी शंका आली.
मात्र हा वास बाहेरुन येत होता. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तर काहींना मळमळायला लागले. काहींना चक्क उलट्याही झाल्या. असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत महापालिकेकडे बोट दाखवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी प्रकट केली. स्वत:ची जबाबदारी झटकणाºया प्रदूषण मंडळावर सोशल मीडियातून सडकून टीका सुुरु झाली.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एखाद्या कारखान्यातून किंवा नाल्यांत विषारी रसायने सोडल्यामुळे पहाटे व सकाळी दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पंधरवड्यापासून नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी पहाटे हा त्रास असह्य झाल्याचे अनेक रहिवाशांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले आहेत.
महापालिकेकडून खाडीत सोडल्या जाणाºया घरगुती सांडपाण्यामुळे थंडीच्या काळात सकाळच्या वेळी दुर्गधी पसरत असल्याचा हास्यास्पद दावा मंडळाने केला आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज क्र. एकमधील रासायनिक सांडपाण्याचे चेंबर ओव्हरफ्लो होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चेंबर्सवर काही पाईप टाकण्यात आले असून त्यातून सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. हे सांडपाणी सदर चेंबरमधून बाहेर येऊन दुर्गंधी पसरत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. याकडे एमआयडीसी आणि एमपीसीबीचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
गोग्रासवाडी, गोपाळनगर, गांधीनगर, पी अँड टी कॉलनी, आजदे, नांदिवली, ठाकुर्ली, ९० फूट रस्ता, खंबाळपाडा परिसरात दुर्गंधी पसरली होती. कुजलेला मुळा, चोकअप ड्रेनेजमधून येणाºया दुर्गंधीमुळे श्वसनाला त्रास होत असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. बुधवारी पहाटेपासून प्रदूषणाचा प्रचंड त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या. एमआयडीसीमध्ये अनेक समस्या आहेत. तेथे होणाºया प्रदूषणाचा त्रास हा डोंबिवलीकरांसह ठाकुर्ली, आता पलावापर्यंतच्या पट्ट्यातही होतअसल्याने प्रदूषण मंडळाने याकडे गांभीर्याने बघावे, अन्यथा मनसे स्टाईलने त्याविरुद्ध आंदोलन केले जाईल. सातत्याने यासंदर्भात पत्रव्यवहार केले आहेत. शांततेच्या मार्गाने जर कंपन्यांमध्ये सुधारणा होत नसेल तर आता आम्हाला आमच्या मार्गाने नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे लागेल.
- राजू पाटील, आमदार
गेल्या दोन दिवस पासून डोंबिवलीतील बहुसंख्य परिसरात रासायनिक दर्पयुक्त वासाने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २५वर्षांपासून एमआयडीसी व लगतचा परिसराला हे नवीन नाही. हिरवा पाऊस, प्रोबेस स्फोट इत्यादी घटना घडल्या की दिखाऊ कारवाई केल्याचे दाखवायचे. आता याच प्रदूषणाची व्याप्ती डोंबिवली पश्चिमेला खाडीपर्यंत गेली असल्याने तसेच ठाकुर्ली ९० फूट रोडपर्यंत हा त्रास जाणवत आहे. तसेच सकाळी रेल्वे प्रवाशांना डोंबिवलीतून प्रवास करतांनाही उग्र दर्प येत आहे. सुस्त प्रशासन यंत्रणेवर कोणाचाच वचक नसल्याने हे वारंवार घडत आहे. शांतताप्रिय डोंबिवलीकरांना अनेक समस्या भेडसावत आहेत पण ते मूग गिळून बसले आहेत.
स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक फक्त पत्रव्यवहार करतात. मूळ समस्येच्या खोलात जाऊन येथील प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यास कोणीही धजावत नाही. आम्ही सातत्याने प्रदूषणाविरुद्ध आक्रोश करून थकलो आहोत.
- राजू नलावडे, रहिवासी,एमआयडीसी
गांधीनगर येथे पहाटे घरी असतांनाच गॅस लिक झाल्यासारखा वास आला. घर तपासून झाल्यावर सकाळी लोकलने प्रवास करीत असतांना ठाकुर्ली येथून कल्याणला लोकल निघाल्यावर प्रचंड उग्र वास आला. अनेक प्रवाशांना दर्पामुळे मळमळायला लागले. प्रदूषण मंडळ, एमआयडीसीने याकडे लक्ष द्यायला हवे. अन्यथा डोंबिवलीचा भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही.
- लता अरगडे, रहिवासी
डोंबिवलीतील सर्वच प्रदूषणांकडे एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यांचा कानाडोळा आर्थिक साट्यालोट्यातून असल्याचे बोलले जात आहे. एमआयडीसीचे अधिकारी प्रदूषणावर नियंत्रण ठेवत नाहीत. लोकवस्तीच्या ठिकाणी होणाºया प्रदूषणासंदर्भात हिवाळी अधिवेशनात प्रश्न-लक्षवेधी मांडणार आहोत. कल्याणमध्ये एमपीसीबीचे कार्यालय आहे. प्रदूषण डोंबिवलीत होत असल्याने डोंबिवलीतच हे कार्यालय सुरु करावे. त्यामुळे डोंबिवलीत प्रदूषणावर या कार्यालयाचे नियंत्रण राहील.
- आ. गणपत गायकवाड, कल्याण पूर्व
मी सकाळी ९.३० वाजता त्या भागात गेलो होतो. तेव्हा तेथे कोणताही दर्प नव्हता. पण आमचे माजी अध्यक्ष एस. वाय. जोशी हे पहाटे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना कुजलेल्या घाणीसारखा उग्र दर्प आला होता. त्यानुसार कंपन्यांचीही चौकशी केली; पण कुठेही कसलाही वास आला नाही. रासायनिक वायूगळती झाला नसल्याचे प्रथमदर्शनी आलेल्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे.
- देवेन सोनी, अध्यक्ष, कामा संघटना