प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बॅरिस्टर ही पदवी वगळता त्यांच्या इतर सर्व पदवी या अर्थ विषयक आहेत. आपल्या देशाने जगाला जे मोठे अर्थतज्ज्ञ दिले त्यातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांनी पीएचडीसाठी संघराज्य व्यवस्थेवरील केलेले संशोधन, लेखन हे अत्यंत सखोल, विस्तृत आहे. त्यांचा 'भारतीय रुपया प्रश्न, उगम आणि उपाय', हा ग्रंथ तर आम्हाला पुर्ण समजला, असा दावा आजही कुठलाही अर्थतज्ज्ञ करु शकणार नाही, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने विचारमंथन व्याख्यानमालेतील अकरावे पुष्प रविवारी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार' या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी उपस्थित होते. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ पुस्तकी अर्थतज्ज्ञ नव्हते ते कार्य कुशल प्रशासक देखील होते. भारतातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.आंबेडकर होते. देशात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना, कामगारांच्या कामाचे तास १२ वरून ८ तास करणे आणि महिला कर्मचाऱ्यांना प्रसुतीपूर्व रजा हे सर्व त्यांच्या प्रयत्नातून झालेले बदल आहेत. महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाबाबत बोलताना ते म्हणाले, काही विषयात या दोघांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी देशाच्या हिताबाबत त्यांनी कायम एकत्र काम केले.
‘कायदेतज्ज्ञ’ म्हणून बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या न्याय व हक्कांसाठी विविध आंदोलनातून लढा दिलाच शिवाय कायदेमंत्री म्हणून अनेक लोकहितकारी व विशेषत्वाने स्त्री कल्याणकारी कायदे केले हे त्यांचे मोठेपण असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून, ‘’राज्य घटनेच्या सर्वसमावेशक निर्मितीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याव्यतिरिक्त दुसरे कोणी करू शकले नसते’’ - असे काढलेले उद्गार हे बाबासाहेबांच्या एकमेवाव्दितीय कार्यकर्तृत्वाचे द्योतक असल्याचे सांगत डॉ. जाधव यांनी बाबासाहेबांना ब्रिटीश चरित्रकारांनी ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ संबोधले व ते पुढे रुढ झाले अशीही माहिती दिली.