ठाणे : विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा मूल्यांचा संविधानात समावेश केला. ही मूल्ये समाजात रुजवण्याचे कार्य आतापर्यंत कायद्याच्या, संविधानाच्या मदतीने चालू होते. पण गेल्या ६-७ वर्षांत त्याला सुरुंग लागत असलेला आपण पाहत आहोत. लोकशाही समाजवाद उतरंडीला लागून भांडवलशाही प्रबळ होते आहे. दुर्बळांना न्याय मिळेनासा झाला आहे. समानता, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची घसरण होते आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांची शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही शिकवण आज अधिकच उपयोगी ठरणार आहे आणि तिचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम जोगदंड यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सद्य:स्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते. झूमवर झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले.
सुप्रसिद्ध लेखक आणि अनुवादक अमरनाथ सिंग म्हणाले, आंबेडकरांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांची अस्मिता जागृत केली आणि त्यांना संघर्ष करण्यासाठी आपल्याबरोबर उभे केले. पण तरीही त्यांना एका जातीत बंदिस्त करणे बरोबर नाही, ते फक्त दलितांचे नाहीत तर सर्व समाजाचे प्रतिनिधी होते. संविधानात समतेचे, लोकशाहीचे मूल्य असूनही आजही समाजातून विषमता नष्ट झाली नाही. जातिव्यवस्थेची जबरदस्त पकड समाजावर आहे. ती नष्ट झाल्याशिवाय सर्वांचा विकास होणे शक्य नाही. हा मूलभूत बदल होण्यासाठी कायद्याने प्रयत्न होत आले तरी लोकांकडून त्यासाठी काम होणे आवश्यक आहे. यासाठीच बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष करा, हा विचार आज महत्त्वाचा आहे.
-------
जोड बातमी पुढे