लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्यात १३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या मॅफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात गैरप्रकार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. परिणामी परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्तांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून मीरारोड पोलीस ठाण्यातील ‘ते’ ५ पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
मीरारोड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन जगतापसह सतीश निकम, संतोष पाटील, जाधव व अतुल गोसावी यांच्या पथकाने १२ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास पूनम गार्डन मार्गावरील युनिक कोरम इमारतीजवळ सापळा रचला होता. त्या ठिकाणी आनंद त्रिवेदी (३३) रा. समुदरलाल चाळ, रावळपाडा, दहिसर पूर्व व इम्रान मोहम्मद अंसारी (३८) रा. रश्मीउत्सव, नित्यानंद नगर, मीरारोड हे दोघे आले असता त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३० ग्रॅम एमडी ही अमली पदार्थाची पावडर सापडली. त्या पावडरची किंमत ४५ हजार रुपये इतकी दाखवली होती. निकम यांनीच तशी फिर्याद पोलिसात दिली होती.
परंतु या दाखल गुन्ह्यात गैरप्रकार झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी चौकशी सुरू केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पाच पोलिसांनी संगनमत करून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तस्करास हाताशी धरून हा गुन्हा नोंद केला होता. त्या तस्करास वाचवत सदर अटक दोन आरोपींना घटनास्थळी बोलावून घेतले होते. यात आर्थिक देवाण घेवाण झाल्याची शक्यता तपासून पहिली जात आहे.
या प्रकरणात जप्त दाखवलेला एमडी पावडरचा साठा ३० ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचा देखील संशय आहे. अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याची सुपारी घेऊन हा गुन्हा दाखल केल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. पोलिसांच्या हाती एक क्लिप लागली असून सीसीटीव्ही तसेच अन्य बाबी तपासल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधला असता, हा गुन्हा कशा पद्धतीने दाखल झाला व नेमकी काय वस्तुस्थिती होती, त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.