लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेतील कर्जबाजारी कामगार मंदार भोईर (३५, रा. नूतन भवन, टेंभीनाका, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट त्याने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर टाकली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दारूच्या आहारी गेलेला मंदार अनेक दिवसांपासून कर्जामुळे तणावाखाली होता. २० जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घरातील स्वच्छतागृहात जाऊन त्याने गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट त्याने टाकली होती. आयुष्याला कंटाळून जीव देत आहे. माझे काही चुकले असेल तर माफ करा. आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. आपल्यावर कर्ज झाले असून कर्जाला आणि एकाकीपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचेही त्याने यात म्हटले आहे. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याला काही मित्रांनी तसेच नातेवाइकांनी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणाचाही फोन घेतला नाही. चार वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मात्र, व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. तो महापालिकेत सफाई विभागामध्ये हंगामी स्वरूपात नोकरी करीत होता. गेल्या काही दिवसांपासून तो कामावर गेलेला नव्हता. टेंभीनाका येथील सिनेगॉग चौकाच्या मागील बाजूला असलेल्या नूतन भवन इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर तो वास्तव्याला होता. त्याने आत्महत्या केल्याचे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्याच्या घरात मद्याच्या बाटल्याही आढळून आल्या. त्याच्यावर नेमके किती आणि कोणाचे कर्ज होते, याचा कुठेही उल्लेख नाही. त्याच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितील खामगळ अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात कर्जबाजारी ठामपा कामगाराची दारूच्या नशेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:19 PM
कर्जबाजारी असलेल्या मंदार भोईर या ठाणे महापालिकेतील कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे. दारुच्या नशेमध्ये त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आत्महत्येपूर्वी टाकली फेसबुकवर पोस्ट