कोरोनाचा परिणाम, ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पडला लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:32 AM2020-03-20T02:32:32+5:302020-03-20T02:32:54+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महासभा न घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर करण्याची महापौरांची आशा मावळली आहे.
ठाणे : शहरातील विकासकामांसाठी मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर करण्याची धडपड मागील काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही सुरू होती. मात्र, आता कोरोनामुळे अर्थसंकल्पही लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महासभा न घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर करण्याची महापौरांची आशा मावळली आहे.
अर्थसंकल्पास ३१ मार्चपूर्वी मंजुरी मिळणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे अर्थसंकल्प मार्चपूर्वी मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होतो, त्यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठवून यंदाचा अर्थसंकल्प वेळीच सादर करून मार्चअखेर मंजूर करण्याची मागणी केली होती. अखेर मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने तातडीने गेल्या काही दिवसांत स्थायी समितीच्या बैठका आयोजित करून अर्थसंकल्पात काही बदल सुचवले आहेत. या अर्थसंकल्पावर अद्याप चर्चाच सुरू असून, त्यास अंतिम मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, ही बैठक लवकरच घेण्यात येणार असून त्यात अर्थसंकल्पास मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत अर्थसंकल्प सादर होऊ शकला नव्हता. त्यानंतरही शिवसेनेने अर्थसंकल्प लवकर सादर करण्याची मागणी प्रशासनाकडे पुन्हा केली होती.