किन्हवली : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या ऍन्युटी हायब्रीड योजनेचे काम अत्यंत मंद गतीने सुरू असल्याने या योजनेअंतर्गत समाविष्ट रस्त्यांची फारच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असताना आता धुळीमुळे मुख्य ग्रामीण रस्ता असलेला शेणवे - किन्हवली रस्ता धुरळ्यात गुदमरल्याचे दिसते. त्यामुळे वर्दळीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांची गती वाढवून वाहतूकदारांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.शेणवे - किन्हवली - सरळगाव - देहरी प्र.जि.मा.क्र. ६४ हा रस्ता महत्त्वाकांक्षी एॅन्युटी हायब्रीड या योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावरील ३० किमी अंतराचे रुंदीकरण, डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ६ मीटर रूंद होणार आहे. या मार्गावर शहापूर तालुक्यात शेणवे, मळेगाव, बेडीसगाव, उंभरई, किन्हवली या ठिकाणी पिकअप शेड बांधणे, काँक्रिटीकरण करणे याही कामांचा समावेश असून यासाठी सुमारे ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामाला उशीरा सुरुवात करण्यात आली असून खड्डे बुजवण्याचे कामही संथगतीने केले जात आहे. काही ठिकाणी रस्त्यावरच खडीचे ढिगारे टाकण्यात आल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. काम सुरू असतानाही या मार्गावर सध्या वाहतूक सुरू आहे. त्यामुळे धुळीचे लोट उठत असल्याचे चित्र आहे. परिणामी, खड्ड्यांमुळे आधीच त्रस्त वाहनचालक आणि नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. बऱ्याच दिवसांपासून सर्दी, खोकला, दमा, फुफ्फुसाच्या आणि श्वसनाच्या आजारांनी हैराण रु ग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती खाजगी डॉक्टरांकडून मिळाली. दरम्यान, शहापूरचे आ. पांडुरंग बरोरा यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणात या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तरीही परिस्थिती तशीच आहे.एॅन्युटी हायब्रीड योजनेची वर्कआॅर्डर अद्यापही झालेली नसून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे जानेवारीला एॅन्युटीचे काम सुरू होईल.- रामचंद्र डोंगरे,शाखा अभियंता, किन्हवली
धुळीत गुदमरला शेणवे - किन्हवली रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:43 PM