‘आरपीएफ’मुळे परत मिळाले दागिने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 01:44 AM2019-05-05T01:44:41+5:302019-05-05T01:45:31+5:30
ठाणे रेल्वेस्थानकावर लोकलची वाट पाहताना अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज विसरलेली बॅग ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या दक्षतेमुळे नवी मुंबईच्या नेरूळ येथील देसाई दाम्पत्याला काही तासांतच मिळाली.
ठाणे - ठाणे रेल्वेस्थानकावर लोकलची वाट पाहताना अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज विसरलेली बॅग ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या दक्षतेमुळे नवी मुंबईच्या नेरूळ येथील देसाई दाम्पत्याला काही तासांतच मिळाली. ही घटना शुक्रवारी घडली असून विसरलेल्या बॅगेतील वस्तूंची खातरजमा झाल्यावर त्या बॅगेतील ऐवज त्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणे आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांनी दिली.
नेरूळ येथील दत्तप्रसाद देसाई (३२) आणि त्यांची पत्नी संचिता (३०) हे दाम्पत्य शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-९ येथे लोकलची वाट पाहत बसले होते. लोकल फलाटावर लागताच घाईगडबडीत लोकलमध्ये चढताना संचिता या आपली हॅण्डबॅग विसरल्या.
दरम्यान, त्याच फलाटावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान अरुण कुमार आणि विक्रमाजित या दोघांच्या निदर्शनास ती बॅग आली. त्यांनी ही बाब तातडीने सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.बी. मेघे यांना सांगितली. बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, आठ हजार ५०० रुपयांची रोकड, मंगळसूत्र, नेकलेस, दोन बांगड्या, दोन कानांतील रिंगा, दोन रिंगा, चार पेंडण्ट आणि एटीएमकार्ड असा ऐवज मिळून आला.
बॅगेमध्ये होते ९० ग्रॅमचे दागिने
सोन्याचे दागिने अंदाजे ९० ग्रॅम वजनाचे असून त्यांची किंमत दोन लाख ५० हजार इतकी आहे. याचदरम्यान देसाई दाम्पत्याला बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार करणार तोच एक बॅग आरपीएफ पोलिसांना मिळाली असल्याचे सांगितले. आरपीएफमध्ये त्यांनी धाव घेतल्यावर ती त्यांची असल्याचे स्पष्ट झाल्यावर आरपीएफ पोलिसांनी बॅगेतील ऐवजाची खातरजमा झाल्यानंतर ती परत केल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.